समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात
बसचालकाचा होरपळून मृत्यू, 21 प्रवासी जखमी
काटा वृत्तसेवा |
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर शुक्रवारी (2 जानेवारी) पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास लासूर स्टेशनजवळ (साखळी क्र. 463+600) भीषण अपघात झाला. मुंबईहून नागपूरकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बस (एमएच 19 सीएक्स 3015) एका ट्रकला मागून धडकल्याने बसला आग लागली. या दुर्घटनेत बसचालक अमोल सुरेश शेलकर (वय 35, रा. खामगाव, जिल्हा बुलडाणा) यांचा जळून मृत्यू झाला, तर बसमधील 29 पैकी 21 प्रवासी जखमी झाले.
प्राथमिक माहितीनुसार, दुसऱ्या लेनमध्ये ओव्हरटेक करत असताना ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारी ट्रॅव्हल्स बस ट्रकवर आदळली. धडकेनंतर बसने तात्काळ पेट घेतला. प्रवाशांनी काचा फोडून व आपत्कालीन दरवाजा तोडून बाहेर पडत आपले प्राण वाचवले.
चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न अपयशी
अपघातानंतर बसचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. बसचालक समोरच्या बाजूला अडकले होते. प्रवाशांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी मदतीसाठी आरडाओरड केली; मात्र काही सेकंदांतच बसने भीषण पेट घेतल्याने संपूर्ण बस आगीच्या गोळ्यात बदलली. यात बसचालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला.
जखमींवर उपचार, ट्रकचालक ताब्यात
जखमी 21 प्रवाशांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी महेश शेळके यांच्यावर उपचार सुरू असून उर्वरित प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. शिल्लेगाव पोलिसांनी रायपूर (छत्तीसगड) येथील ट्रकचालकास ताब्यात घेतले असून उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. सर्व प्रवासी बुलडाणा जिल्हा व परिसरातील रहिवासी आहेत.
मदत पोहोचण्यास उशीर
पहाटे 2:45 वाजता वैजापूर पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली.
पहाटे 2:49 वाजता वेरूळ इंटरचेंजला कळविण्यात आले.
वेरूळ येथून 15 किमी अंतर पार करत ‘क्यूआरव्ही’ वाहन व रुग्णवाहिकेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी सुमारे 22 मिनिटे लागली, तर वैजापूरहून रुग्णवाहिका पोहोचण्यास 31 मिनिटांचा कालावधी गेला. त्यामुळे आपत्कालीन मदत उशिरा पोहोचल्याचा मुद्दा समोर आला आहे.
अपघाताची संभाव्य कारणे
अपघाताबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत:
एमएसआरडीसी: बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात.
महामार्ग पोलिस: ट्रकला ओव्हरटेक करताना धडक किंवा ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने अपघात.
प्रवासी: थांबा घेतल्यानंतर अवघ्या दीड तासात अपघात झाल्याने चालकाला डुलकी लागली असावी.
प्रत्यक्षदर्शी प्रवाशाची हृदयद्रावक प्रतिक्रिया
“पहाटे जोरात आवाज झाला आणि लोक किंचाळू लागले. मागचा आपत्कालीन दरवाजा उघडत नव्हता, तो एका प्रवाशाने तोडला. आम्ही एकामागोमाग बाहेर पडलो. चालक अडकले होते, त्यांना वाचवण्यासाठी आम्ही मदत मागत होतो, पण काही क्षणांतच बस पेटली आणि सर्व काही संपले,” असे एका प्रवाशाने सांगितले.