February 7, 2026 8:37 am

शिक्षण उद्ध्वस्त करण्याचा सरकारी अजेंडा?

शिक्षण उद्ध्वस्त करण्याचा सरकारी अजेंडा?

आता शिक्षकांनीच भटके कुत्रे हाकलायचे!

काटा वृत्तसेवा I 

मुंबई : राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना अध्यापनापासून पूर्णपणे दूर ढकलण्याचा जणू विडाच उचलला आहे. आधीच विविध शिक्षणबाह्य कामांच्या ओझ्याखाली मेटाकुटीला आलेल्या शिक्षकांवर आता थेट भटके कुत्रे हाकलण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. शाळा परिसर स्वच्छता व सुरक्षेच्या नावाखाली एका शिक्षकाची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नेमणूक करून, शाळेच्या आवारात भटके कुत्रे फिरू नयेत, याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तांच्या या परिपत्रकाने शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शिक्षक हे शिकवण्यासाठी आहेत की प्रशासनाच्या अपयशाची भरपाई करण्यासाठी? असा थेट प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

देशभरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षिततेबाबत निर्देश दिले. मात्र, त्या निर्देशांचा अर्थ शिक्षकांना कुत्रे पकडणारे कर्मचारी बनवणे असा काढला जाणे, हे शिक्षण व्यवस्थेचे भीषण अपयश नाही का?

‘बिबटे आले तरी शिक्षकच जबाबदार?’

या निर्णयावर तीव्र शब्दांत टीका करत मुंबई मुख्याध्यापक संघटना (उत्तर विभाग) अध्यक्ष अनिल बोरनारे म्हणाले,
“शिक्षण विभागाने शिक्षकांची खिल्ली उडवली आहे. एकीकडे मंत्री शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी केल्याच्या पोकळ घोषणा करतात आणि दुसरीकडे अधिकारी शिक्षकांना कुत्रे हाकलण्याचे आदेश देतात. करोना काळात शिक्षकांना दारूच्या दुकानाबाहेर उभे केले. आता भटके कुत्रे! उद्या बिबटे, मगरी किंवा साप शाळेत शिरले तर त्यालाही शिक्षकच जबाबदार ठरवले जातील का?”

शिक्षक म्हणजे सर्वकामगार? शिक्षणाऐवजी अशैक्षणिक कामांचा बोजा : आता भटक्या कुत्र्यांची जबाबदारीही शिक्षकांवर?

परिपत्रकानुसार, प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करून, त्याची माहिती शाळेच्या प्रवेशद्वारावर लावायची आणि स्थानिक महापालिकेला कळवायची आहे. म्हणजेच, जर एखादी दुर्घटना घडली तर थेट शिक्षकांनाच जबाबदार धरायचे, असा छुपा हेतू या आदेशामागे दडलेला असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.

आता भटक्या कुत्र्यांची जबाबदारीही शिक्षकांवर?

भटक्या कुत्र्यांचे निर्बंधन, पकड, लसीकरण आणि पुनर्वसन ही कामे स्थानिक स्वराज्य संस्थांची आहेत. मग प्रशासनाच्या अपयशाची किंमत शिक्षकांनी का मोजायची?

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ?

शिक्षक संघटनांचे स्पष्ट म्हणणे आहे की, अशा अशैक्षणिक आदेशांमुळे शिक्षकांचा वेळ, ऊर्जा आणि लक्ष अध्यापनापासून दूर जात आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सरकारच्या धोरणांमुळे होत आहे, हे आता उघड सत्य झाले आहे.

“प्रत्येकवेळी शिक्षकांना वेठीस धरून शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारने शिक्षकांना चपराकांप्रमाणे आदेश देणे थांबवावे. अन्यथा शिक्षक रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशाराही शिक्षक संघटनांनी दिला आहे.

0
0

Leave a Reply

Realted News