February 7, 2026 11:21 am

60–65 नगरसेवक बिनविरोध कसे निवडून येतात? – संजय राऊतांचा थेट सवाल

पैशाच्या माजातून लोकशाहीवर हल्ला

60–65 नगरसेवक बिनविरोध कसे निवडून येतात? – संजय राऊतांचा थेट सवाल

सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही संशय

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बिनविरोध निवडी म्हणजे लोकशाहीची सरळसरळ गळचेपी असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षांनी पैशाचा माज दाखवत लोकशाही प्रक्रियाच मोडीत काढल्याचा आरोप करत, “60 ते 65 नगरसेवक बिनविरोध कसे निवडून येतात? हे कोणत्या लोकहिताच्या कर्तृत्वावर?” असा थेट सवाल त्यांनी भाजपला केला आहे.

इतक्या मोठ्या संख्येने बिनविरोध निवडी होणे ही केवळ योगायोगाची बाब नसून, यामागे दबाव, भीती, धमक्या आणि पैशांचा अमानुष खेळ असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. “हे लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक असून, मतदारांचा मतदानाचा मूलभूत हक्क हिरावून घेतला जात आहे,” असे ते म्हणाले.

 

बिनविरोध निवडी म्हणजे लोकशाहीची हत्या

“देशाच्या किंवा जगाच्या लोकशाही इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडी कधीच झालेल्या नाहीत,” असे सांगत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांच्या हेतूंवर संशय व्यक्त केला. अटल बिहारी वाजपेयी, बॅरिस्टर नाथ पै, वसंतदादा पाटील, राम मनोहर लोहिया किंवा आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील कधी बिनविरोध निवडून आले नाहीत. मग महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या संख्येने लोक कोणत्या कर्तृत्वावर बिनविरोध निवडून येत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

‘साम, दाम, दंड, भेद’चा उघड वापर

महाराष्ट्रात सध्या निवडणूक नव्हे तर सत्तेचा बाजार भरला आहे, असा आरोप करत राऊत म्हणाले की, विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला लावण्यासाठी ‘साम, दाम, दंड, भेद’ या सगळ्या पद्धती वापरल्या जात आहेत. पाच-पाच कोटी रुपयांच्या ऑफर दिल्याच्या चर्चा असून, जळगाव, कल्याणसारख्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या बॅगा फिरल्याचे आरोपही त्यांनी केले.

“इतका प्रचंड पैशांचा खेळ या देशाच्या लोकशाहीत कधीच झाला नव्हता. हे आकडे केवळ राजकीय पक्षांनाच नव्हे, तर पत्रकार, विश्लेषक आणि सामान्य जनतेलाही हादरवणारे आहेत,” असे ते म्हणाले.

निवडणूक यंत्रणेचाच गैरवापर?

या प्रकरणात निवडणूक यंत्रणेची भूमिकाही संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. माघारीसाठी ठरलेली वेळ संपल्यानंतरही अर्ज स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्याचा दावा करत, “तीन वाजल्यानंतर अर्ज घ्या, पण वेळ तीन वाजण्याआधीची दाखवा, अशा सूचना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयातून गेल्याची माहिती आमच्याकडे आहे,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.

जर या प्रकरणात कोणकोणाचे फोन आले, कोणत्या मंत्र्यांनी आणि कोणत्या कार्यालयातून दबाव टाकला, याची चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

निवडणूक आयोगाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

या सगळ्या प्रकारामुळे महाराष्ट्राची लोकशाही प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप करत राऊत म्हणाले, “जर 60–60 उमेदवार बिनविरोध निवडून येत असतील, तर ही निवडणूक कसली? मग मतदारांनी करायचं काय?” मतदारांचे हक्क पायदळी तुडवले जात असताना निवडणूक आयोग गप्प का, असा सवाल करत त्यांनी आयोगावरही टीकेची झोड उठवली.

“निवडणूक आयोग हा भ्रष्टाचाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर बनलं आहे. सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुलं होणं लोकशाहीसाठी घातक आहे,” असा अत्यंत तीव्र आरोप त्यांनी केला.

सखोल चौकशीची जनहितार्थ मागणी

सत्ताधारी पक्षांनी पैशाच्या बळावर लोकशाहीवर केलेला हा हल्ला असून, अशा प्रकारे बिनविरोध नगरसेवक निवडून येणे ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका म्हणजे केवळ दिखावा उरेल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

लोकशाही टिकवायची असेल, तर या पैशाच्या आणि दबावाच्या राजकारणाला आवर घालणं ही काळाची गरज असल्याची भावना आता जनतेतूनही व्यक्त होत आहे.

0
0

Leave a Reply

Realted News