February 7, 2026 9:57 am

कळमेश्वर तालुक्याच्या विकासकामांचा समन्वय समितीत सखोल आढावा

कळमेश्वर तालुक्याच्या विकासकामांचा समन्वय समितीत सखोल आढावा

जलजीवन, अतिक्रमण, शेती नुकसानभरपाईसह विकासकामांवर सविस्तर चर्चा

काटा वृत्तसेवा I कळमेश्वर :
                          तालुक्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कळमेश्वर तहसील कार्यालयात तालुका समन्वय समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी भूषविले.

या बैठकीत जलजीवन मिशनची अंमलबजावणी, शासकीय व जागेवरील अतिक्रमण, शेती नुकसानभरपाई, अवैध दारू विक्री, विकासकामांचा प्रलंबित आढावा अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीला नगर परिषद कळमेश्वरचे उपाध्यक्ष धनराज देवके, मोहपा नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रमोद तपासे, इमेश्वर यावलकर, संदीप उपाध्ये, मीना तायवाडे, बेबी धुर्वे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अजय वाटकर, प्रकाश वेरुळकर, वैभव टेकाडे यांच्यासह तहसीलदार विकास बिक्कड, पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे, गटविकास अधिकारी कुश मोटवानी (भा.प्र.से.) तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत कळमेश्वर शहरातील मुख्य रस्त्यालगतची अतिक्रमणे हटवून सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण करणे, कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती, जलाशयातील पाणी शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी कालव्यांची स्वच्छता व दुरुस्ती, नागपूर–मोहपा (कोहळी मार्गे) बस सेवा सुरू करणे, तसेच नियमानुसार नोंदणी (रजिस्ट्री) प्रक्रिया सुलभ करण्याबाबत चर्चा झाली.

याशिवाय विविध विभागांतील रिक्त पदे तातडीने भरणे, बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई, पांदण रस्त्यांना क्रमांक देणे, तसेच शेती नुकसानभरपाई त्वरित देण्याबाबत प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, अशा सूचना उपस्थित सदस्यांनी केल्या.

कळमेश्वरच्या भविष्यातील नियोजित विकासाच्या दृष्टीने शहरालगतची सिलिंग जमीन व शासकीय जमीन नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करावेत, हा महत्त्वाचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला.

या बैठकीला पंचायत समिती, वन विभाग, तालुका कृषी कार्यालय, पोलिस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघु सिंचन, जलसंधारण, मृद व जलसंधारण विभाग, नगर परिषद कळमेश्वर व मोहपा, भूमी अभिलेख कार्यालय, सहायक व दुय्यम निबंधक कार्यालय, आगार नियंत्रक, वीज वितरण कंपनी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी नायब तहसीलदार ज्योती जाधव, संदीप तडसे, निवडणूक लिपिक बिलाल खान, संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार संजयकुमार कांबळे, पवन चव्हाण, श्रेयश भोपळे आदींनी सहकार्य केले.

तालुक्याच्या विकासासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी केले.

0
0

Leave a Reply

Realted News