आर्वीमध्ये माथेफिरूचा भाजी बाजारात हल्ला : एका शेतकऱ्याचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
वर्धा | प्रतिनिधी
वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात बुधवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. शहरातील गजबजलेल्या इंदिरा भाजी मार्केट परिसरात एका युवकाने काठीने हल्ला केल्याने एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य दोघे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आर्वी येथील रहिवासी असलेला मथुरेश उर्फ मत्या लाडके (वय २२) याने सकाळच्या सुमारास भाजी बाजारात अचानक हल्ला केला. बाजारात शेतमाल विक्रीसाठी आलेले शेतकरी आपल्या कामात व्यस्त असताना हा प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला.
या हल्ल्यात संजय रामकृष्ण राऊत (वय ७०) या वृद्ध शेतकऱ्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तसेच रामराव महादेवराव वांगे (वय ८५) आणि शहजाद हे दोघे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींवर सेवाग्राम येथे उपचार
जखमी शेतकऱ्यांना तत्काळ आर्वी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना वर्ध्यातील सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
आरोपी ताब्यात
घटनेनंतर नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. माहिती मिळताच आर्वी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीची मानसिक स्थिती अस्थिर असल्याची शक्यता वर्तवली जात असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
शहरात संताप, कठोर कारवाईची मागणी
दिवसा गजबजलेल्या बाजारात अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बाजार परिसरात सुरक्षेचे उपाय वाढवावेत अशीही मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
![]()