August 15, 2025 6:06 am

Farmer dies due to lightning strike : वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

 पिंपळखुटा येथील घटना, पोलिसांकडून आकस्मिक मृत्युची नोंद

अमरावती : मोर्शी नजिकच्या पिंपळखुटा (लहान) येथे शेत शिवारात वीज पडून ५२ वर्षीय शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना शिरखेड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असल्यामुळे संबंधित पोलिस तपास करीत आहे. मृत शेतकरी तालुक्यातील निंभी येथील रहिवासी असून त्यांची ओळख मधुकर मुकुंदराव पैठणकर अशी झाली आहे.  काल शनिवार, १९ जुलैला दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
                         पैठणकर यांचे वडिलोपार्जित पाच एकर शेत पिंपळखुटा (लहान) शिवारात आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते आपल्या शेत शिवारात कामाकरिता गेले होते. दरम्यान सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास आकाशात ढग निर्माण होऊन विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्याचवेळी शेतकरी मधुकर यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा शेतातच मृत्यू झाला. सायंकाळ झाली तरी मधुकरराव घरी परत न आल्यामुळे त्यांचा पुतण्या संदीप राजू पैठणकर हा शेतात पाहण्याकरिता गेला असता ते मृत अवस्थेत दिसून आले.
                          सदर घटनेची माहिती संदीप याने निंभी येथील महिला पोलिस पाटील सविता राऊत यांना दिली. पोलिस पाटील सविता राऊत यांनी शिरखेड आणि मोर्शी पोलिस स्टेशन तसेच मोर्शी येथील महसूल विभागाला कळवले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिरखेड पोलिसांचे पथक व तलाठी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर शनिवारला  मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.  त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिरखेड पोलिसांनी या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास शिरखेड पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News