February 7, 2026 8:38 am

Karanja : घरकाम करणाऱ्या १०१ सावित्रीच्या लेकींचा साडी-चोळी देऊन सन्मान

घरकाम करणाऱ्या १०१ सावित्रीच्या लेकींचा साडी-चोळी देऊन सन्मान

कारंजा | दि. ५ जानेवारी २०२६
क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतिबा फुले यांच्या जयंती पर्वानिमित्त कारंजा शहरात स्वयंपाक, धुणी-भांडी, झाडू-पोछा आदी घरकाम करणाऱ्या १०१ महिलांचा साडी-चोळी व स्मृतिचिन्ह देऊन भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. कारंजा कला क्रीडा अकादमी, गुरुकुल पब्लिक स्कूल व माळी महासंघ कारंजा यांच्या संयुक्त पुढाकारातून हा आगळा-वेगळा उपक्रम शहरात प्रथमच राबविण्यात आला.

आर्वी विधानसभेचे आमदार सुमितदादा वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी चित्रपट यशवंतचे दिग्दर्शक पीयूष विजय भोंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले. यावेळी लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ. कमल गवई (भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री), मिशन आयएएसचे संचालक डॉ. प्रा. नरेशचंद्र काठोळे व विद्या काठोळे, वर्धा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सरिता गाखरे तसेच ठाणेदार अनिल मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्व. मन्नालाल मातादिन अग्रवाल सभागृहात आयोजित या सोहळ्यात आयोजकांच्या व शहरातील दानदात्यांच्या सहकार्याने पाहुण्यांचे पुष्प, ग्रामगीता व शाल देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात १०१ घरकाम करणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ, पुस्तक, सन्मानचिन्ह तसेच साडी-चोळी देऊन गौरव करण्यात आला.

गुरुकुल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी धनश्री किशोर जत्ती हिने सादर केलेली ‘मी सावित्री बोलतेय’ ही नाट्यछटा, तसेच सावित्री-जोतिबा यांची रांगोळी साकारणाऱ्या वैष्णवी राजेश घिमे व आदित्य या युवा कलाकारांचे विशेष कौतुक करण्यात आले. स्वागतगीत व सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित गीत सादर करणारे विद्यार्थी तसेच दानदात्यांचाही पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार सुमितदादा वानखेडे यांनी शहरात प्रथमच अशा स्वरूपाचा सन्मान सोहळा होत असल्याचे नमूद केले. सावित्रीबाई फुले या महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श असल्याचे प्रतिपादन डॉ. कमल गवई यांनी केले. महिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मिशन आयएएसचे संचालक डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी केले. फुले दाम्पत्यांनी समाजातील विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानावर दिग्दर्शक पीयूष भोंडे यांनी प्रकाश टाकला.

या प्रसंगी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय सेवा दिलेल्या स्वर्गीय भारती प्रकाश धारपुरे, स्वर्गीय नीलिमा राजेश जोरे व स्वर्गीय प्रा. वंदना अशोक पराडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय विलास वानखेडे यांनी केला, तर आभार प्रदर्शन शरद बोके यांनी केले. सूत्रसंचालन जया विनोद ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारंजा कला क्रीडा अकादमी, गुरुकुल पब्लिक स्कूल व माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच दानदात्यांनी सहकार्य केले.

मुख्य आयोजक विलास वानखेडे (अध्यक्ष, कारंजा कला क्रीडा अकादमी), अजय भोकरे (सचिव, गुरुकुल पब्लिक स्कूल) व संजय कदम (माळी महासंघ, कारंजा) यांच्या पुढाकाराने हा सन्मान सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

0
0

Leave a Reply

Realted News