नारा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन
४२ वर्षांची परंपरा असलेला सातदिवसीय महोत्सव १४ ते २१ जानेवारी दरम्यान
कारंजा (घाडगे) | दि. १४ जानेवारी २०२६
नारा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त ४२ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला व. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव बुधवार, १४ जानेवारीपासून २१ जानेवारीपर्यंत नारा येथील व. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. अत्यंत भावपूर्ण, शिस्तबद्ध व हृदयस्पर्शी धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका या कालावधीत पार पडणार असून, २१ जानेवारी रोजी मुख्य पुण्यतिथी सोहळा होणार आहे.
महोत्सवाची सुरुवात बुधवारी पहाटे ५ वाजता राष्ट्रसंतांच्या दरबारात तीर्थस्थापना व चरण-पादुका पूजनाने होणार आहे. यावेळी डॉ. शैलेश जसाणी व ओमप्रकाश पालीवाल उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येऊन श्रीमद् भागवत ग्रंथाची स्थापना करण्यात येणार आहे. ग्रामगीता प्रणीत शिवमहापुराण कथा ह.भ.प. सौ. रामप्रियाश्रीजी (माई), अमरावती यांच्या सुमधुर वाणीतून भाविकांना श्रवणास मिळणार आहे.
सोमवार, २० जानेवारी रोजी भव्य ग्रंथदिंडी व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीत गावातील भजन मंडळे, हरिपाठ मंडळे, बाहेरगावाहून येणाऱ्या पालख्या तसेच शालेय विद्यार्थी सहभागी होणार आहेत. रात्री राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. श्री. नारायणदासजी पडोळे महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
मंगळवार, २१ जानेवारी रोजी गोपालकाला व मुख्य पुण्यतिथी सोहळा संपन्न होणार आहे. या वेळी ह.भ.प. संत श्री. सयाजी महाराज (वर्धा), आमदार व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, विधान परिषद आमदार दादाराव केचे, आर्वी विधानसभा आमदार सुमित वानखेडे, सल्लागार सुधीर दिवे, माजी अध्यक्षा सरिता गाखरे, मानव जोडो संघटनेचे अध्यक्ष रमेश सरोदे, नगरपंचायत कारंजाचे उपाध्यक्ष भगवानजी बुवाडे, माजी सभापती निताताई गजाम तसेच सामाजिक कार्यकर्ते बाबाराव सोमकुवर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
![]()
महोत्सवातील दैनंदिन कार्यक्रम
पुण्यतिथी महोत्सवादरम्यान दररोज पहाटे ५ वाजता सामुदायिक ध्यान व चिंतन, सकाळी ७ वाजता गावांमध्ये रामधून, दुपारी भजन सेवा, सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना व हरिपाठ, तर रात्री ८ वाजता शिवमहापुराण कथा प्रवचन व आरती असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच ग्रामस्वच्छता, खंजेरी भजन, महिला मेळावा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
रविवार, १९ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीनिमित्त गुरुदेव युवती फाउंडेशन व गुरुदेव युवा फाउंडेशन यांच्या वतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सातदिवसीय महोत्सव श्री. गुरुदेव नवरतन सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, पुण्यतिथी महोत्सवात मोठ्या संख्येने गुरुदेव भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गुरुदेव नवरतन सेवा मंडळ व गुरुदेव युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
![]()