मुंबई : एमआयएमचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काल अचानक मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजला नाही. पण यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जलील आपल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी ठाकरेंकडे गेले असतील, असा अंदाज वर्तवला आहे.
अंबादास दानवे यांनी काही दिवसांपूर्वी ईदच्या निमित्ताने इम्तियाज जलील यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी ईदच्या शुभेच्छा देण्याशिवाय या भेटीत काहीही नवीन नसल्याचा दावा केला होता. जलील यांनी यावेळी आपली बाजू स्पष्ट केली होती. मी दरवर्षी अंबादास दानवे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी जातो. ते ही ईदच्या निमित्ताने माझ्या घरी येतात. आमच्यात राजकीय मतभेद आहेत म्हणून आम्ही एकमेकांचे शत्रू आहोत असे नाही. त्यामुळे या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नका, असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
इम्तियाज जलील काल दुपारी मातोश्री या ठाकरे कुटुंबाच्या निवासस्थानी पोहोचले. तिथे त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेचा तपशील बाहेर आला नाही. त्यामुळे या भेटीचे कारण काय? उभय नेत्यांत काही राजकीय चर्चा झाली का? इम्तियात जलील ठाकरे गटाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशा वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेले असतील -दानवे
दुसरीकडे, अंबादास दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्या मातोश्री भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचा दावा केला आहे. इम्तियाज जलील यांच्या मुलाचे लग्न आहे. या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते मातोश्रीवर गेले असण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे व इम्तियाज जलील यांच्या मुलाचीही थोडीफार ओळख आहे. त्यामुळे जलील लग्नपत्रिका देण्यासाठी मातोश्रीवर गेले असतील, असे दानवे म्हणाले.
संजय शिरसाट यांच्यावर केली होती टीका
उल्लेखनीय बाब म्हणजे इम्तियाज जलील यांनी नुकतीच खुलताबादचे नामांतर रत्नपूर असे करण्याच्या मुद्यावरून शिंदे गटाचे नेते तथा कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्यावर टीका केली होती. तुम्ही शहरांची, इमारतींची व रस्त्यांची नावे बदलत आहात. आता नावे बदलण्याची मालिका सुरूच झाली असेल, तर तुम्ही तुमच्या बापाचेही नाव बदलून घ्या. आता अजून राहिले तरी काय? सांगून टाका की, आम्हाला हे नाव आवडले नव्हते, त्यामुळे आम्ही ते बदलले, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेचा संजय शिरसाट यांनी खरपूस समाचार घेतला होता.