राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाच्या विशेष शिबिराचे मोहगाव (सावंगी) येथे भव्य आयोजन
मोहपा | प्रतिनिधी : विद्यार्थ्यांमध्ये समाजभान, श्रमसंस्कार व राष्ट्रसेवेची भावना रुजविणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मोहपा (ता. कळमेश्वर, जि. नागपूर) यांचे विशेष निवासी शिबिर जि. प. प्राथमिक शाळा, मोहगाव (सावंगी), ता. कळमेश्वर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचा उद्घाटन सोहळा नुकताच दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी गुरुवारी संपन्न झाला.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शमसुद्दीन शेख होते. प्रमुख पाहुणे म्हणून मोहपा शिक्षण मंडळाचे संचालक तेजराजजी नाखले उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सरपंच आशुतोष तभाने, उपसरपंच शालिनीताई म्हैसकर, पर्यवेक्षक श्री. विजय चिमोटे, कुसुमताई वानखेडे विद्यालयाचे मुख्याध्यापक उदय अंजनकर, रेखडे विद्यालय पिपळा (किन) चे मुख्याध्यापक वसंत धकिते, माजी सरपंच विजयराव ठाकरे, पोलीस पाटील प्रकाशराव मोहोड, समाजसेवक संतोषराव नाखले, ग्रामपंचायत सदस्य प्रेम उईके, दर्शन बागडे, छबूताई कुरसंगे, रामराव म्हैसकर, डॉ. निवेदिता राऊत, श्रीमती वाघमारे व श्री. झाडे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात NSS कार्यक्रमाधिकारी व नागपूर जिल्हा समन्वयक विवेक देशमुख यांनी शिबिरातील विविध उपक्रमांची माहिती दिली. उद्घाटनपर भाषणात तेजराजजी नाखले यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन केले. सरपंच आशुतोष तभाने यांनी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शमसुद्दीन शेख यांनी NSS शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व श्रमसंस्कार रुजतात, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन कु. देवयानी गुडधे हिने केले, तर आभार कु. ऐश्वर्या हिवरकर हिने मानले.
![]()
शिबिरादरम्यान संस्कृती संवर्धन, महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण, आरोग्य जनजागृती, रक्तदान, आरोग्य तपासणी व व्यसनमुक्ती यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. दररोज ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, प्रभातफेरी व जनजागृती रॅलीद्वारे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.
व्यसनमुक्ती विषयावर प्रदीप विघ्ने यांनी मार्गदर्शन केले, तर नामदेव उंबरकर यांनी कराटेच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले. लाईफ लाईन ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर तर शुअरटेक हॉस्पिटल, नागपूर यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचा समारोप दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी झाला, तर ३१ डिसेंबर रोजी शिबिरार्थ्यांचे प्रस्थान झाले. या शिबिराच्या माध्यमातून न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने ग्रामविकासात मोलाचे योगदान दिले असल्याचे दिसून आले.
समारोपीय कार्यक्रमाचे संचालन कु. कोमल कावडकर हिने केले, तर आभार कु. श्रावणी डांगोरे हिने मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोहगाव येथील ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.