‘विदर्भाची पंढरी’ धापेवाड्यात होणार विठूरायाचा गजर
गुरुपौर्णिमेनंतर १० व ११ जुलैला भव्य यात्रा 
का टा वृत्तसेवा I विजय नागपुरे
कळमेश्वर : विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र धापेवाडा १० व ११ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनंतर आयोजित यात्रेनिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीने दुमदुमणार आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पंढरपूरहून प्रत्यक्ष भगवंत श्रीक्षेत्र धापेवाडा येथे चंद्रभागेच्या तिरी असलेल्या स्वयंभू विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात येतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे विदर्भासह मध्य प्रदेशातूनही हजारो भाविक येथे येतात.
देवस्थान समितीचे उपाध्यक्ष भानुप्रताप सिंग पवार यांनी यंदा ३०० ते ३५० दिंड्यांच्या आगमनाची शक्यता वर्तविली आहे. यात्रेच्या निमित्ताने गावातील प्रत्येक घरी दिंडी व भजनी मंडळींचा मुक्काम असतो आणि ग्रामस्थही त्यांचे मनोभावे स्वागत करतात. १० जुलै रोजी वाळवंटातील काला, तर ११ जुलै रोजी मंदिरात काला होणार आहे. त्यानंतर १५ जुलैला प्रक्षाळ पूजेनंतर भगवंतास अभिषेक करण्यात येईल आणि रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होईल.

यात्रेच्या प्रमुख दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आमदार डाॅ. आशिष देशमुख यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी महापूजा होणार आहे. सात दिवस चालणार्या या यात्रेत पूजावस्तू, धातूच्या मूर्ती, शेती उपकरणे, खेळणी यांची मोठी बाजारपेठ सजते. शेतकरी, गृहिणी आणि लहानग्यांसाठी ही यात्रा आकर्षण ठरते.
भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून नागपूर, कळमेश्वर, सावनेर, काटोल, मोहपा आदी ठिकाणांहून विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतने पाणी निर्जतुकीकरण, बंद पथदिवे दुरुस्ती, रस्ते स्वच्छता यांसह प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय पथक सज्ज ठेवले आहे.


मंदिर परिसरात सावनेर व कळमेश्वर पोलिसांच्या मदतीने बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे. काल गुरूवारला पोलीस अधिक्षक हर्ष पोतदार यांनी धापेवाडा मंदिर व प्रस्तावित यात्रा परिसराची पाहाणी केली. यावेळी उपविभागिय पोलीस अधिकारी अनिल मस्के, कळमेश्वर पोलीस निरिक्षक मनोज काळबांडे व सावनेरचे पोलीस निरिक्षक उमेश पाटील व सावळी चे माजी सरपंच मंगेश चोरे उपस्थित होते. देवस्थान समितीचे उपाध्यक्ष भानुप्रतापसिंग पवार यांनी श्रीक्षेत्र धापेवाडा देवस्थानच्या वतीने पोलीस अधिक्षक हर्ष पोतदार यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.




