नागपूर : आज नागपूर येथे रेल्वे विभागीय आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत आमदार डॉ. देशमुख यांनी रेल्वे गेटवर उड्डाणपूलाचे बाबतीत प्रभावीपणे रोखठोक भूमिका घेत उड्डाणपूल मंजूर करून घेतला. कळमेश्वर शहरातून-चौदा मैल/गोंडखैरी औद्योगिक वसाहतीकडे (एमआयडीसी) जाणाऱ्या मार्गावर असलेल्या रेल्वे गेटवरील वाढत्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघून रेल्वे गेटवर उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी दिली आहे.
दररोज हजारो कामगार, विद्यार्थी, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे क्राॅसिंग वरील गेटमुळे अनेक तास वाहतुकीत अडकावे लागत होते. एमआयडीसीतील कारखान्यांमधून काम करणाऱ्या कामगारांना रेल्वे क्राॅसिंग वरील गेटमुळे कामावर उशिरा पोहोचल्याने आपल्या रोजीरोटीला मुकावे लागत होते. परिसरातील उपरवाही, लोणारा, सावंगी, कळंबी, सेलू इ. गावातील अनेक गंभीर रुग्ण, गरोदर महिलांना वेळेवर उपचाराअभावी जीव गमवावा लागला आहे. याची गंभीर दखल घेत आमदार डाॅ. देशमुख यांनी रेल्वे उड्डाणपूलाचा प्रश्न मार्गी लावल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.
कळमेश्वर-औद्योगिक वसाहतीकडे (एमआयडीसी) जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपूलाचा प्रश्न मार्गी लावल्याने विद्यार्थी, कामगार, रुग्णांसहीत सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. कित्येक दशकापासून प्रलंबीत विषय मार्गी लावल्याबद्धल नागरिकांनी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांचे आभार मानले आहे. कळमेश्वर यार्ड (कळमेश्वर एमआयडीसी गेट) मधील लेव्हल क्राॅसिंग गेट क्रमांक २८९ च्या जागी बांधलेल्या रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) बद्दल तपशीलानुसार आता हे काम पुढील मंजुरी आणि अंमलबजावणीसाठी मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम), रस्ते सुरक्षा प्रकल्प [CAO(C)RSP] मध्य रेल्वे (CP) मुख्यालय (HQ) कडे हस्तांतरित करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात दिले आहे. या वेळी बैठकीत संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांसोबत संदीप उपाध्याय, सोनू नवदिंगे, तुषार उमाटे, गौरव मंगरूळकर, राजू वऱ्हाडे, आशिष फुटाणे, सुनील जालानदर, नितीन गोस्वामी उपस्थित होते.