स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी जिल्ह्यातील 17 पोलीस स्टेशन मध्ये
2772 स्पर्धकांनी दिली परीक्षा
काटा वृत्तसेवा :संजय मते भंडारा: जिल्ह्यातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला विद्यार्थी स्पर्धेच्या या युगात मागे राहू नये, यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी ‘प्रकल्प दिशा’ साकारला आहेे. जिल्ह्यातील दहावी, अकरावी, बारावी व त्यापुढे पदवी परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क एमपीएससी, यूपीएससी, पोलीस, तलाठी, वनरक्षक पदांसाठीच्या भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी एक अभूतपुर्व प्रकल्पाची पायाभरणी केली आहे.. पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात साकार ‘प्रकल्प दिशा’ व्दारे आयोजीत परिक्षेसाठी भंडारा जिल्ह्यात 2772 विद्यार्थ्यांनी काल 29 जूनला लेखी परीक्षा दिली. ‘दिशा प्रकल्पाला’ जिल्हयातील होतकरू अभ्यासू तरूणाइने तितक्याच उत्स्फुर्तेने प्रतिसाद दिला आहे.
पो. अ. नुरूल हसन यांचेनुसार जिल्ह्यात शेकडो विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असून योग्य मार्गदर्शन व आर्थिक परिस्थितीमुळे एमपीएससी, यूपीएससी परीक्षेसारख्या स्पर्धा परिक्षांपासून वंचित राहतात. कोचिंग घेऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी ‘प्रकल्प दिशा’ हा नाविन्यपूर्ण प्रकल्प जिल्ह्यात राबविण्याचा संकल्प पो. अ. हसन यांनी केला आहे. या अंतर्गत स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांच्यां निवडीसाठी परिक्षेचे आयोजन काल दि. 29 जूनला करण्यात आले होते. ही परीक्षा भंडारा जिल्ह्यातील सर्व 17 पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यात आंधळगावच्या जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात सर्वाधिक 504 स्पर्धकांनी परीक्षेत भाग घेतला. तर जिल्ह्यातून 2772 विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिली आहे. या प्रकल्पाला स्पर्धकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.
या नाविन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत ही स्पर्धा परिक्षा घेण्यात आल्याची माहिती आंधळगाव पो. स्टे. चे ठाणेदार नितीन राठोड यांनी दिली आहे. आंधळगाव पो. स्टे. ला राठोड यांनी परिक्षेपुर्वी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. ‘प्रकल्प दिशा’ या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशन मधून टाॅप 50 अशा विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे निवड होउन त्यांना राज्यातील विविध तज्ञ विषय शिक्षकांकडून तसेच विविध मोठ्या पदांवर कार्यरत अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याशिवाय ऑनलाईन व यूट्यूब द्वारे सर्वच इच्छूक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहीती ठाणेदार नितीन राठोड यांनी दिली आहे. जिल्ह्यातील 17 पोलीस स्टेशन अंतर्गत परीक्षेमध्ये स्पर्धकांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादासाठी पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनीअभिनंदन केले आहे. पो. अ. हसन यांनी होतकरू, गरजू विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी ‘प्रकल्प दिशा’ उपक्रम राबवून मदतीचा हातंच् नव्हे तर युवकांच्या जीवनाला दिशा देवून एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या ‘दिशा प्रकल्प’ या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.