कळमेश्वर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार, मे. अंबुजा सिमेंट लिमिटेड कंपनीकडून दहेगाव–गोवरी येथे प्रस्तावित भुयारी कोळसा खाण प्रकल्पावर 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता लोकसुनावणी होणार आहे. ही सुनावणी कंपनीच्या खाणीच्या ठिकाणी – खसरा क्र. 10, वलनी, ता. नागपूर ग्रामीण येथे आयोजित करण्यात आली आहे.
1562 हेक्टर क्षेत्रफळामध्ये विकसित होणाऱ्या या खाणीची वार्षिक उत्पादन क्षमता 1 दशलक्ष टन इतकी असेल. प्रकल्पात गोवरी, सिंदी, खैरी, तोंडाखेरी, बोरगाव खुर्द, बेलोरी आणि झुणकी या गावांचा समावेश आहे.
नागरिकांना या प्रकल्पाविषयी आपले सुचना, विचार, टिप्पणी किंवा आक्षेप तोंडी किंवा लेखी स्वरूपात नोंदवण्याची संधी मिळणार आहे. यासाठी पर्यावरण मूल्यांकन अहवालाचा मसुदा, तसेच मराठी व इंग्रजीतील कार्यकारी सारांश तहसिल कार्यालय, कळमेश्वर येथील प्रस्तुतकार-1 शाखेत अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
तहसिलदार विकास बिक्कड यांनी नागरिकांनी सदर प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करून सुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन कळमेश्वर तहसील कार्यालयाद्वारे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.