February 7, 2026 8:38 am

अजित पवारांचे सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप तरीही मी सत्तेत

पुण्यात अजित पवारांनी भाजपला करून दिली कटू सत्याची आठवण

पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले. माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, हे सर्वांना माहिती आहे. पण ज्या लोकांनी माझ्यावर हे आरोप केले, त्यांच्याच सोबत मी आज सरकारमध्ये बसलो आहे, हे वास्तव आहे, असा थेट सवाल करत अजित पवारांनी भाजप नेत्यांना अडचणीत आणले. त्यांच्या या विधानामुळे पिंपरी-चिंचवडच्या निवडणूक प्रचारात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

                          अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचे सध्या एकच लक्ष्य आहे. कुठे आणि कशातून भ्रष्टाचार करून पैसे कमावता येतील. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक असलेली पिंपरी-चिंचवड पालिका कशी कर्जाच्या खाईत ढकलली गेली, हे जनतेने पाहिले आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, पालिकेच्या सुमारे 8 हजार कोटी रुपयांच्या ठेवी भाजपच्या सत्ताकाळात मोडण्यात आल्या. या ठेवी मोडून नेमकी कोणती विकासकामे झाली, याचा हिशोब जनतेसमोर मांडावा, अशी थेट मागणी त्यांनी केली.

                           भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार अधिक आक्रमक झाले. पिंपरी-चिंचवडमध्ये भ्रष्टाचार इतका वाढला आहे की अवघ्या सव्वा किलोमीटर रस्त्यासाठी 81 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, असा धक्कादायक दावा त्यांनी केला. आम्ही कधीही सत्तेचा उन्माद होऊ दिला नाही, पण सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती, नशा आणि माज चढला आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे रस्ते विकास आणि निधी वाटपावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

                          पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पूर्णपणे भ्रष्टाचाराने पोखरली असल्याचा आरोप करत अजित पवारांनी विविध प्रकल्पांचा उल्लेख केला. रस्ते, शिक्षण व्यवस्था, कुत्र्यांची नसबंदी यासारख्या मूलभूत सेवांमध्येही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी भाजपकडे शहराच्या विकासाचा कोणताही ठोस व्हिजन नसल्याचा आरोप करत त्यांनी थेट जनतेला आवाहन केले. पिंपरी-चिंचवडच्या जनतेने घड्याळ-तुतारीच्या युतीचे उमेदवार निवडून द्यावेत. मी रोज पाण्याची व्यवस्था करून दाखवीन. मी जे बोलतो, ते करून दाखवतो, तेवढी ताकद माझ्यात आहे, असे ठाम शब्दांत अजित पवार म्हणाले.

                         भाजपच्या सत्ताकाळावर टीका करताना अजित पवारांनी 1992 ते 2017 या कालावधीचा उल्लेख केला. या काळात पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट केला, हवा तो विकास घडवून आणला, असा दावा त्यांनी केला. मात्र 2017 साली एक राजकीय लाट होती आणि त्याच काळात विठ्ठल मूर्ती घोटाळा घडला, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे त्या काळातील महापौर आज भाजपमध्ये असून आमच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शरद पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये विकासाला गती दिली, असे सांगत त्यांनी जुन्या नेतृत्वाची आठवण करून दिली.

                         आर्थिक स्थितीवर भाष्य करताना अजित पवारांनी सांगितले की, 2017 पूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ठेवी सुमारे 4844 कोटी रुपयांच्या होत्या. मात्र आज त्या घटून सुमारे 2000 कोटींवर आल्या आहेत. प्रत्यक्षात या ठेवी वाढायला हव्या होत्या, पण सत्ताधाऱ्यांनी कर्जरोखे काढून पालिकेवर कोट्यवधींचे कर्ज लादले, असा आरोप त्यांनी केला. भाजपच्या सत्ताकाळात टेंडर प्रक्रियेत रिंग करून पैसे लाटले गेले, दादागिरी करण्यात आली आणि रस्ते अरुंद केल्याने वाहतूक कोंडी वाढली, असेही त्यांनी नमूद केले.

भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्याची तयारी

                       आमच्या काळात शहरात सुसाट प्रवास होत होता, पण आज अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावली आहे, असा टोला अजित पवारांनी लगावला. अनेक ठिकाणी अतिक्रमण वाढले असून तिथे हफ्तेखोरी सुरू असल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या नऊ वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात झालेला हा विकास जनतेने पाहावा, असे सांगत त्यांनी टेंडरमध्ये रिंग आणि भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्याची तयारी दर्शवली. पुराव्याशिवाय मी बोलत नाही, कोणावरही बिनबुडाचे आरोप करत नाही. ही राक्षसी भूक मला पाहवत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आता या आरोपांवर भाजपकडून काय प्रत्युत्तर येते, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

0
0

Leave a Reply

Realted News