मुंबईचे माजी पोलिस आयुक्त रिबेरो म्हणाले- शहाणपणाचा, धाडसाचा उत्तम नमुना
मुंबई : माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचे कौतुक केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवैध उत्खननाच्या कारवाईवरून अधिकाऱ्यांना सुनावले होते. त्यावेळी अंजना कृष्णा यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत घेतलेली भूमिका समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. यावरून रिबेरो यांनी “एका तरुण अधिकाऱ्याने दबाव न मानता योग्य ती भूमिका घेतली हे अत्यंत आनंददायक आहे,” असे मत व्यक्त केले.
शुक्रवारी मुंबईत ‘द ब्रह्मास्त्र अनलीश्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. माजी पोलिस महासंचालक तसेच मुंबई पोलिस आयुक्त राहिलेले डी. शिवानंदन यांनी हे पुस्तक लिहिले असून, यावेळी ज्युलिओ रिबेरो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेव्हा त्यांनी अंजना कृष्णा यांच्या धाडसी भूमिकेचे कौतुक करताना, “मी वृत्तपत्रात वाचले की एका तरुण मुलीने उपमुख्यमंत्र्यांच्या दबावासमोर झुकण्याऐवजी त्यांच्यासोबत झालेला संवाद रेकॉर्ड करून ठेवला. हा तिचा शहाणपणाचा आणि धाडसाचा उत्तम नमुना आहे,” असे सांगितले. या संबंधीचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
अजित पवार किंवा अंजना कृष्णा यांचे नाव घेतले नाही
रिबेरो यांनी भाषणादरम्यान अजित पवार किंवा अंजना कृष्णा यांचे नाव घेतले नाही. मात्र त्यांनी सूचकपणे या घटनेचा उल्लेख केला. “राजकारणात आणि प्रशासनात अनेकदा अधिकारी दबावाखाली वागताना दिसतात. मात्र एखादा अधिकारी कायद्याच्या चौकटीत राहून आपले कर्तव्य पार पाडतो आणि दबाव न मानता ठाम राहतो, तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाही मजबूत होते,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.
कायद्यापुढे कुणीही मोठे नसते
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात अवैध माती उत्खनन प्रकरणामुळे अंजना कृष्णा या वादाच्या केंद्रस्थानी आल्या होत्या. त्यांनी कायदेशीर कारवाई करताना दाखवलेली कणखर भूमिका अनेकांना भावली. त्यावरूनच ज्युलिओ रिबेरो यांनी त्यांचे कौतुक केले. “अधिकारी जर प्रामाणिकपणे काम करत असतील, तर त्यांना राजकीय दबावाखाली काम करण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. अंजना कृष्णा यांनी दाखवून दिले की कायद्यापुढे कुणीही मोठे नसते,” असे रिबेरो यांनी अधोरेखित केले.













Users Today : 2
Users Yesterday : 11