पंचनाम्यासाठी ड्रोन व मोबाईल फोटोंना मान्यता
मुंबई : महाराष्ट्रात गत काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अमाप नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांचे जवळपास संपूर्ण मंत्रिमंडळ आजपासून अतिवृष्टीग्रस्तांच्या भेटीसाठी राज्याच्या राजधानीबाहेर पडले आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
ते म्हणाले की, दुष्काळाच्या वेळी लागू होणारे नियम आता अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी देखील वापरले जातील, जेणेकरून शेतकऱ्यांना मदत करणे सोपे होईल. नुकसानीचे पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्यावर भर असून, जिथे पारंपरिक पद्धतीने पंचनामे करणे शक्य नाही, तिथे ड्रोनचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, जर शेतकऱ्यांनी मोबाईलने फोटो काढून नुकसानीचा पुरावा दिला, तरी तो ग्राह्य धरला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या परिस्थितीत नियमांचा अडसर न आणता यंत्रणांनी लवचिक राहून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.
चमकोगिरी करणाऱ्यांना चिखलात लोळवा – राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अतिवृष्टीग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदत सामग्रीवर एकनाथ शिंदे व मंत्री प्रताप सरनाईक यांचा फोटो लावण्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. फोटो लावून तुटपुंजी मदत द्यायला तुम्हाला शेतकरी भिकारी वाटला का? असा संतप्त सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
काळजी करू नका, शासन आपल्या सोबत -कृषिमंत्री

जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले आहे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेती शिवाराची आज कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. सोमठाणा, ता.बदनापूर, ढाकलगाव, ता. अंबड या गाव शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन “काळजी करू नका, शासन आपल्या सोबत आहे” असा धीर दिला. एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे सांगतानाच तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
शेतकऱ्यांना 100 टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद – जरांगे

महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्याला अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा पूराने वेढला गेला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अशात मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पावसामुळे नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील चिंचपुर ढगे व पिंपळगाव येथे भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारने निकष न लावत जेवढे नुकसान झाले आहे, तेवढी मदत द्यावी. अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा दिला आहे.
पंकजा मुंडे ट्रॅक्टरमधून पूरग्रस्तांच्या भेटीला

मंत्री पंकजा मुंडे यांनी आज ट्रॅक्टरमधून प्रवास करत जालन्यातील पूरग्रस्तांची भेट घेतली. त्या म्हणाल्या, जालना जिल्ह्यातील गोळेगाव ता. परतूर या गोदाकाठी वसलेल्या गावाला नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. संपूर्ण गाव पुराच्या पाण्याने वेढले, शेतात पाणी साचले तसेच ग्रामस्थांना विस्थापित व्हावे लागले अशा परिस्थितीत गावात ट्रॅक्टरने जाऊन नुकसानीची पाहणी केली. आमदार बबनराव लोणीकर, राहूल लोणीकर, तसेच जिल्हाधिकारी सीईओ व सर्व अधिकारी यावेळी सोबत होते. गोळेगावच्या पूनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू असा शब्द दिला. नुकसानग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू व इतर मदत तातडीने देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या.












Users Today : 3
Users Yesterday : 11