चंद्रपूर : जिल्ह्यातील जुनोना येथील जंगलात २३ ऑगस्ट रोजी अस्वलाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले वडील अरुण कुकसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर मुलावर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. अरुण कुकसे यांना नागपुरातील ‘एम्स’मध्ये दाखल केले होते साेमवारी २५ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पितापुत्राच्या बचावासाठी गावकऱ्यांनी अस्वलावर हल्ला केला होता. यात जखमी झालेल्या अस्वलाचाही रविवार २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.
शनिवारी २३ ऑगस्ट रोजी अरुण व विजय कुकसे हे पिता-पुत्र जुनोना जंगलात पाने तोडण्यासाठी गेले होते.अरुण कुकसे यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. वडिलाला वाचवण्यासाठी विजयने अस्वलाशी भिडला. मात्र अस्वलाने दोघांनाही पंज्यात पकडून गंभीर जखमी केले. या वेळी दोघांनी आरडाओरडा केल्याने त्यांचा आवाज ऐकून गावकरी जंगलात धावले. त्यांनी बापलेकाच्या बचावासाठी अस्वलावर हल्ला केला. तरी अस्वलाने तासभर दोघांना सोडले . यात अरुण कुकसे हे गंभीर जखमी झाले होते.
गावकऱ्यांनी दोघांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. वडील अरुण हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपुरातील ‘एम्स’मध्ये दाखल केले. सोमवारी २५ ऑगस्टला सकाळी अरुण कुकसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलगा विजय रुग्णालयात उपचार घेत आहे. वनविभागाने कसोशीने प्रयत्न करत जखमी अस्वलाला पकडले. मात्र लोकांच्या हल्ल्यात तेही गंभीर जखमी असल्याने रविवारी २४ ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला.
अस्वलाच्या हल्ल्यात मेंदू बाहेर निघाला
जुनोना जंगलातील या थराराचे काही नागरिकांनी चित्रण केले. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहेे. यात पिता-पुत्रांना अस्वलाने पकडून ठेवल्याचे दिसत असून गावकरी अस्वलाला हाकलून लावण्यासाठी प्रयत्न करीत आहे. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, अरुण कुकसे यांच्या डोक्यावर अस्वलाने गंभीर प्रहार केल्याने त्यांच्या मेंदूचा काही भाग आणि दोन्ही डोळे बाहेर आले होते. अरुण कुकसे यांच्या परिवाराला २५ लाख रुपये आर्थिक भरपाई तर मुलगा विजयला वनविभागात नोकरी द्यावी, अशी मागणी जुनोना वासीयांनी केली.