आंब्याचा सिझन आल्याने भिडे बरळतोय : अमोल मिटकरी

राष्ट्रवादीचा संभाजी भिडेंवर घणाघात: अजित पवारांनीही घेतला समाचार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते असा वादग्रस्त दावा करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी भिडेंवर निशाणा साधत आंब्याचा सिझन आल्यामुळे ते असे बरळत असल्याची टीका केली आहे. स्वतः अजित पवारांनीही शिवरायांच्या स्वराज्यात सर्वच जाती धर्माच्या लोकांना स्थान होते असे नमूद करत भिडे यांचा दावा खोडून काढला आहे.
                       अमोल मिटकरी यासंबंधी अकोल्यात बोलताना म्हणाले की, सध्या आंब्याचा सिझन आला आहे. त्यामुळे संभाजी भिडे बेताल बरळत आहेत. त्यांनी बहुजन समाजातील पोरांना हाताशी धरून इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर व विकृत इतिहास लिहिणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्यावर बोलावे. ते यांच्यावर का बोलत नाहीत? अमोल मिटकरी यांनी यावेळी आता संभाजी भिडे यांची व्हॅलिडीटी संपल्याचा टोलाही हाणला.

 

                         दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संभाजी भिडे यांचा दावा खोडून काढला आहे. संभाजी भिडे त्यांना वाटेल ते बोलू शकतात. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात सर्वच जाती धर्माचे लोक सुखाने नांदत होते. शिवाजी महाराज एक आदर्श राजे होते. रयतेचे राजे होते. सर्वांनीच राजा म्हणून त्यांचे नेतृत्व स्वीकारले होते, असे ते कोल्हापुरात बोलताना म्हणाले.
                          सरकारमध्ये असो वा विरोधी पक्षात, राजकीय नेत्यांनी आपल्या विधानातून सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने मुस्लिम राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकि‍र्दीत देखील अनेक मुस्लिमांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या विधानांच्या मागचा हेतू मला समजला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जाती किंवा पंथाच्या आधारावर कुणाशी भेदभाव केला नाही. हा इतिहास आहे आणि तो सर्वमान्य आहे, असेही अजित पवार यावेळी ठणकावून म्हणाले.

संभाजी भिडे काय म्हणाले होते ?

                         शिवप्रतिष्ठाने हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचे समर्थन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते असा वादग्रस्त दावा केला होता. छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते. शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार पुढे नेला. पण आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक हे चुकीचा इतिहास मांडत आहेत, असे ते म्हणाले होते.

                          उल्लेखनीय बाब म्हणजे मंत्री नीतेश राणे यांनीही काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांच्यासारखाच एक दावा केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुस्लिम सैनिक नव्हता. त्यांची लढाई मुस्लिमांविरोधात होती, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचेही राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते.
0
0

Leave a Reply

Realted News