निलंगा तालुक्यातील घटना, आई-मुलांना अटक
लातूर/निलंगा : दारू पिऊन आईला नेहमी मारहाण करतो म्हणून दोन भावंडांच्या रागाचा कडेलोट झाला. वडील आईला मारहाण करत असताना दोघांनी मध्यस्थी करत वडिलांना उलट मारहाण केली. यात वडिलांचा मुलांच्या हातून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना निलंगा तालुक्यातील मौजे बेंडगा (ता. निलंगा) येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून दारूच्या व्यसनाचे कुटुंबावर किती भयानक परिणाम होऊ शकतात, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.
मृत व्यक्तीचे नाव दादाराव चन्नाप्पा मंजुळे असे असून तो दारूच्या नशेत वारंवार पत्नी वत्सलाबाई (६०) यांना मारहाण करत असे. दि. १८ सप्टेंबर रोजी संध्याकाळीही त्याने पत्नीला निर्दयपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रसंग पाहून मुलांचा राग अनावर झाला. मुलगा जीवन मंजुळे (३६) व सजीव मंजुळे ( ३२) यांनी वडिलांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती चिघळली आणि त्यांनी कुऱ्हाडीच्या दांड्याने व लाकडाने वडिलांवर हल्ला केला. डोक्यावर व हातावर बसलेल्या या वारांमुळे दादाराव यांचा जागीच मृत्यू झाला.
अचानक घडलेल्या या घटनेनंतर पत्नी व मुलांनी भीतीने नैसर्गिक मृत्यू झाल्याचे दर्शवून अंत्यविधी उरकण्याचा प्रयत्न केला. मात्र औराद शहाजाणी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृत्यू संशयास्पद असल्याचे स्पष्ट केले व तपास सुरू केल्यानंतर हा खून असल्याचे स्पष्ट झाले.
आईला वाचवताना खून
आईला वाचवण्यासाठी मुलांचा राग अनावर झाल्याने त्यांच्या हातून वडिलांचा खून झाला. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले. या प्रकरणी बीट अंमलदार गौतम भोळे यांच्या फिर्यादीवरून आणि प्राथमिक तपासाअंती मृत्यू हा मारहाणीमुळे झाल्याचे निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी पत्नी वत्सलाबाई तसेच मुलगे जीवन व सजीव या तिघांना अटक करून गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












Users Today : 3
Users Yesterday : 11