♦ सिनेमाला विरोध न करण्याचे केले आवाहन
नाशिक : समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या वादावर माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांनीही भाष्य केले. इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.
महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला, हे चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सगळे नियमाप्रमाणे केल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मला सांगितले, असेही भुजबळ म्हणाले.
‘फुले’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्यावर गदारोळ सुरू आहे. चित्रपटाबाबत विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत. आता सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटाला कात्री लावली आहे. सीबीएफसीने चित्रपटात अनेक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सेन्सॉर बोर्डावर टीका केली. आता छगन भुजबळ यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या चित्रपटाला कुणीही विरोध करू नये, आपण सगळ्यांनी त्यासाठी शुभेच्छा दिल्या पाहिजेत : छगन भुजबळ
भुजबळ म्हणाले, सिनेमाच्या टीमने मला स्पष्ट सांगितले की, फुलेंचा अभ्यास करूनच आम्ही सगळे काही केले आहे. तो सिनेमाचा एक भाग आहे. कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत असे सांगितले. कर्मठ ब्राह्मण असेल त्यांनी फुले यांना त्यावेळेस विरोध केला, काही ब्राह्मण महात्मा फुले यांच्यासोबत देखील लढत होते. त्यांना मदत करत होते. शाळा बंद करत होते, त्यावेळी लहुजी वस्ताद साळवी यांनी देखील मदत केली. दोन्ही बाजू आहेत. इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर हिंदीमध्ये पहिल्यांदाज सिनेमा येत आहे. देशासह देशाबाहेर तो प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला कुणीही विरोध करू नये, असे मला वाटते. आपण सगळ्यांनी त्यासाठी शुभेच्छा दिल्या पाहिजेत, असेही भुजबळ म्हणाले.