August 15, 2025 6:04 am

ई-केवायसी केली तरी संत्रा फळगळ अनुदानापासून शेतकरी अजूनही वंचित

वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा, अनुदानाची मागणी

का टा वृत्तसेवा

वरुड/ शेंदुरजनाघाट : वरुड तालुक्यात गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संत्रा पिकांच्या नुकसान भरपाई मिळण्याकरिता महसुल यंत्रणेमार्फत जानेवारी महिन्यात याद्या प्रसिद्ध करीत लाभार्थी शेतकऱ्यांना आवाहन करून सेतू केंद्रातून ई-केवायसी करायला सांगीतली. शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली. मात्र, त्यावर महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लोटला असून अद्यापही नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. शासनाने त्वरित अनुदान खात्यात जमा करण्याची मागणी लाभार्थी संत्रा उत्पादकांकडून करण्यात येत आहे.

                         आंबिया बहराच्या संत्र्याची गळती होऊन राहिलेला संत्रा कवडीमोल भावाने विकावा लागला, तर दुसरीकडे तालुक्यातील संत्रा बागांवर मृग बहार संत्रा नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. कृषी कर्ज भरण्याकरिता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. शेतकऱ्यांना कृषी कर्ज भरायचे असल्याने त्याकरिता या अनुदानाची रक्कम मिळेल व आपल्या जवळील काही रक्कम टाकून कर्जाची परतफेड करता येईल, असा विचार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केला होता. परंतु, शासनाने त्यांच्या विचारांवर पाणी फेरले.
                          वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालयाकडून अपलोड केलेल्या शेतकऱ्यांची संख्या एकूण १४,३५१ आहे. त्यासाठी अनुदानित रक्कम ५३ कोटी ६५ लक्ष ३८ हजार २७४ रुपये आहे. यामध्ये ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या १२,३१५ असून यासाठी लागणारी अनुदानित रक्कम ४६ कोटी ४१ लक्ष ५९ हजार ७३४ रुपये आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही, त्यांची संख्या २,०३६ आहे. त्यांची अनुदानित रक्कम ७ कोटी २३ लक्ष ७८ हजार ५४० रूपये आहे.

अनुदानाअभावी शेतकरी सापडला अडचणीत :

                        ई-केवायसी केल्यावरही अनुदान रखडल्याने आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानासाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. याविषयी माहिती घेतली असता, अद्यापही शासनाकडून फळगळचे अनुदान आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अनुदान थांबले असल्याची माहिती वरुड तहसील कार्यालयाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News