मुंबई : ठाणे जिल्ह्यातील कल्याण आंबिवलीत राहणाऱ्या एका चोराचे पोलिसांनी चेन्नईत एन्काऊंटर करण्यात आले आहे. ही घटना काल मंगळवारी घडली. त्याची माहिती चेन्नई पोलिसांनी आज कल्याण पोलिसांना दिली. त्यानंतर ही गोष्ट उजेडात आली.
यासंबंधीच्या माहितीनुसार, जाफर गुलाम इराणी असे एन्काऊंटर करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे. जाफर इराणी हा कल्याण आंबिवली परिसरातील इराणी वस्तीत राहत होता. चोरांची एक टोळी विमानाने दुसऱ्या राज्यांत जावून चोरी करायची. या टोळीत जाफर इराणीचा समावेश होता. चेन्नई पोलिसांनी मंगळवारी जाफर इराणीचा एन्काऊंटर केला. या घटनेत त्याचे सलमान मेश्राम व अमजद इराणी हे 2 सहकारी गंभीर जखमी झाले. हे तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
10 किलो सोने घेवून पळून जाताना एन्काऊंटर
पोलिसांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलिसांनी वरील तिघांच्या अनेकदा मुसक्या आळल्या. त्यांना तुरुंगातही डांबले. पण त्यानंतरही ते सुधारले नाही. ते सातत्याने परराज्यात जावून चोरी करायचे. मंगळवारी ते चोरी करण्याच्या उद्देशाने चेन्नईला गेले. तिथे त्यांनी तब्बल 10 किलो सोन्याची चोरी केली. त्यानंतर ते हे सोने घेऊन पळून जात असताना त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. या झटापटीत जाफर गुलाम इराणी हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. तर सलमान मेश्राम व अमजद इराणी हे दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती चेन्नई पोलिसांनी कल्याण पोलिसांना दिली. तसेच आरोपींच्या नातेवाईकांनाही कळवले. या माहितीनुसार, आरोपींचे नातेवाईक कल्याण आंबिवलीवरून चेन्नईला मृतदेह आणण्यासाठी गेले आहेत.
चेन्नईच्या पोलिस आयुक्तांनी दिली माहिती
या प्रकरणाची माहिती देताना चेन्नईचे पोलिस आयुक्त ए अरुण म्हणाले की, जाफर आणि त्याच्या 2 सहकाऱ्यांचा चेन्नईमध्ये 25 मार्च रोजी घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये समावेश होता. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण शहरात त्यांचा शोध घेतला. काही तासांतच दोन आरोपींना अटक केली. तिसऱ्या आरोपीला चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली. तेव्हा हा आरोपी हैदराबादला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसणार होता. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी इराणी दरोडेखोर टोळीशी संबंधित आहेत.
मोटारसायकलच्या आत लपवले होते पिस्तूल
पोलिस आयुक्तांनी सांगितले की, जाफरने चेन स्नॅचिंगच्या घटनांसाठी वापरल्या जाणाऱ्या मोटारसायकलमध्ये पिस्तूल लपवून ठेवले होते. त्याने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला असता त्यात तो जखमी झाला. जाफरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेशी संबंधित दागिने आणि वाहने जप्त केली आहेत.
गोळीबारापूर्वी पोलिसांनी दिला होता इशारा
पोलिसांनी या घटनेची माहिती देणारे एक निवेदनही जारी केले आहे. या निवेदनानुसार, पोलिस अधिकाऱ्यांनी जाफर इराणीला गोळीबार न करण्याचा इशारा दिला होता, पण त्याने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांकडे प्रत्युत्तरादाखल त्याच्यावर गोळीबार करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. त्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यात तो जबर जखमी झाला होता. त्यानंतर त्याचा मृ्त्यू झाला. दरम्यान, जाफरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रॉयपेट्टा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.