‘महसूल सेवक'(कोतवाल)पदास शासकीय चतुर्थश्रेणी दर्जा देण्याच्या मागणी
‘महसूल सेवकांचे धरणे आंदोलन’
का टा वृत्तसेवा : भूषण सवाईकर
कळमेश्वर : महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थश्रेणी दर्जा देण्याच्या मागणीसाठी काल गुरुवारी (दि.११) कळमेश्वर तहसील कार्यालयासमोर महसूल सेवकांनी एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारले. मागणी मंजूर न झाल्यास शुक्रवार (दि.१२) पासून महसूलमंत्र्यांच्या क्षेत्रात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यातील महसूल सेवक (कोतवाल) हा गावाचा कणा आहे. महाराष्ट्र राज्याची विविध शासकीय धोरणे, उपाययोजना, शासन स्तरापासून ते गावपातळीवरील महत्त्वाच्या योजना, तसेच केंद्र शासनाच्या राज्यात सुरू असलेल्या महत्त्वाच्या योजना आदींची अंमलबजावणी राज्यातील अंतिम घटकापर्यंत व्यवस्थितरीत्या पोहोचवण्यासाठी राज्यातील महसूल यंत्रणा जिल्हाधिकारी ते महसूल सेवक (कोतवाल) स्तरापर्यंत कार्यरत असते.
महसूल विभाग हा राज्य शासनाचा क्षेत्रीय योजना राबविणारा सर्वात प्रमुख विभाग आहे. महसुली कामाबरोबरच विविध प्रमाणपत्र देणे, कृषी गटांना शासनाच्या विविध योजना, अभियान मोहिमांचा समन्वय, आपत्ती टंचाई, जनगणना, निवडणुका राजशिष्टाचार, विविध जात प्रमाणपत्रे देणे, अशा अनेक बिगर महसुली कामांची जबाबदारी महसूल विभागावर असते. त्याअर्थी सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजांशी निगडित असलेला आणि त्यामुळे शासनाची प्रतिमा प्रतिबिंबित करणारा हा विभाग आहे.
क्षेत्रीय स्तरावर तलाठी साझा, तसेच वरिष्ठ महसुली कार्यालयांत महसूल सेवक २४ तास शासकीय सेवा देत असून, तो आपली जबाबदारी योग्यरीता पार पाडत असतो; परंतु शासनाने अद्यापपर्यंत महसूल सेवक पदास शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्याप्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाहीत. महसूल सेवक पदाचे महसूल यंत्रणेतील स्थान आणि कार्य लक्षात घेता महसूल सेवकांना इतर महसूल कर्मचाऱ्यांप्रमाणेच शासकीय सेवा-सुविधा देण्यासाठी, चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन महसूल सेवक कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी विदर्भ महसूल सेवक संघटना, कळमेश्वर शाखेने केली आहे.

अन्यथा सर्व महसूल सेवक टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहेत. या धरणे आंदोलनात विदर्भ महसूल सेवक संघटना कळमेश्वर शाखेचे अध्यक्ष मंगेश पारसे, उपाध्यक्ष प्रकाश मडावी, सचिव नितीन मानकर, सदस्य देवेंद्र सांभारे, राहुल हिवरकर, रोशन वैद्य, देवीदास देशभ्रतार, शशिकांत गणोरकर, प्रफुल्ल गेडाम, वामन हाकंदे, चक्रधर पाटील, सूरज किरपाल, मनोज उईके, वैभव आनडे, स्वप्निल तभाने, अमोल राऊत, कांताराम नेहारे इ. उपस्थित होते.
विदर्भ महसूल सेवक संघटना 12 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन व साखळी उपोषण करणार असून जोपर्यंत महसूल सेवकांना चतुर्थश्रेणी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार आहे. राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये क्रीडा संकुल कोराडी येथे आंदोलन सुरू होणार असल्याची माहीती महसूल सेवक स्वप्नील तभाने यांनी आमचे प्रतिनिधीला दिली.



कळमेश्वर तहसील कार्यालयासमोर धरणे देताना विदर्भ महसूल सेवक संघटना चे महसूल सेवक.











