February 7, 2026 8:39 am

कारंजा पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

कारंजा पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करा —
नागरी समस्या संघर्ष समितीची नगरपंचायतीकडे मागणी

कारंजा (घाडगे) – कारंजा शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण न झाल्याने स्थानिक नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. योजनेच्या कामासाठी नगरपंचायतीने २२ नोव्हेंबर २०२३ रोजी कंत्राटदारास कार्यारंभ आदेश दिला होता. आदेशानंतर १८ महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक असूनही आज २४ महिने उलटूनही योजना पूर्णत्वास न गेल्याने नागरी समस्या संघर्ष समितीने कारंजा नगरपंचायतचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे तातडीने काम पूर्ण करून घेण्याची मागणी केली आहे.

खैरी धरणात वर्षभर पाणी उपलब्ध असतानाही शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जुन्या पाणीपुरवठा योजनेमुळे पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून कारंजा शहरासाठी (अमृत 2.0) पाणीपुरवठा योजना शासनाकडून ८ मे २०२३ रोजी मंजूर झाली असून योजनेची कार्यान्वयन संस्था कारंजा नगरपंचायत आहे.

नगरपंचायतीने दिलेल्या १८ महिन्यांच्या मुदतीनंतरही योजनेचे काम अद्याप अपूर्ण असून नवीन योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांत नाराजी वाढली आहे. शहरातील गंभीर पाणीटंचाई लक्षात घेता, कंत्राटदाराकडून तातडीने काम पूर्ण करून घेऊन नागरिकांना दररोज शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरी समस्या संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केली आहे.निवेदन देताना कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

0
0

Leave a Reply

Realted News