February 7, 2026 5:43 am

गडकरी यांचे परखड आणि थेट भाषेत सरकारी अधिकार्यांना खडेबोल

“अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचाही रेकॉर्ड माझ्याच नावावर असला पाहिजे” – नितीन गडकरींचा कडक इशारा

नागपूर | प्रतिनिधी

                    केंद्रीय परिवहन व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या परखड आणि थेट भाषेत सरकारी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. “माझ्या राजकीय आयुष्यात चांगले रस्ते किती झाले, यासोबतच मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकले, किती सस्पेंड केले याचाही रेकॉर्ड झाला पाहिजे. यासाठी मी देशभर हात धुवून मागे लागलो आहे,” असा स्पष्ट इशारा गडकरी यांनी दिला.

नागपूर महापालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी बोलताना गडकरी यांनी सरकारी यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “काम वेळेत होत नाही, नियम पाळले जात नाहीत आणि त्याची शिक्षा मात्र जनतेला भोगावी लागते. मग अशा अधिकाऱ्यांचे काय करायचे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना गडकरी यांनी नागपूर महापालिका आयुक्तांनाही टोला लगावला. “जनतेशी प्रामाणिक राहिले पाहिजे. गोड-गोड बोलतात म्हणून कोणाचेही ऐकायचे कारण नाही. जनता हीच खरी मालक आहे. जी व्यवस्था सर्वसामान्यांना न्याय देत नाही, ती उखडून फेकली पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

“मी काम केले नाही तर मला मुर्दाबाद म्हणण्याचा पूर्ण अधिकार तुमचा आहे,” असे म्हणत गडकरी यांनी आपल्या जबाबदारीची जाणीवही करून दिली.

भाषणाच्या शेवटी हलक्याफुलक्या शैलीत त्यांनी नागपूर मनपा आयुक्तांवर चिमटा काढला. “मी गंमतीने म्हणतो की पुढील लोकसभा निवडणूक माझ्याविरोधात नागपूर मनपा आयुक्त लढणार आहेत. कारण इतका सहहृदयी आयुक्त आतापर्यंत इथे आला नाही. नेते अतिक्रमण थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि अधिकारी काढण्याचा; पण इथे मात्र उलट चित्र आहे,” असे म्हणत त्यांनी सभागृहात एकच हशा पिकवला.

गडकरींच्या या वक्तव्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, त्यांच्या ‘झिरो टॉलरन्स’ भूमिकेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

0
0

Leave a Reply

Realted News