मोहपा येथे सरदार वल्लभाई पटेल यांची पुण्यतिथी सम्पन्न

भारतीय अखंडतेचे शिल्पकार सरदार वल्लभाई पटेल – प्रा. डॉ. संजय ठवळे

मोहपा | प्रतिनिधी

मोहपा येथील बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. संजय ठवळे यांनी सरदार पटेल यांच्या राष्ट्रनिर्मितीतील ऐतिहासिक योगदानावर प्रकाश टाकला.

प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. डॉ. ठवळे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर भारतातील विविध संस्थानांना भारतात विलीन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच आव्हानात्मक कार्य होते. जुनागढ, हैदराबाद आणि काश्मीरसारखी महत्त्वाची संस्थाने योग्य धोरण, मुत्सद्देगिरी आणि प्रसंगी कठोर निर्णयांच्या माध्यमातून भारतात विलीन करून घेण्यात सरदार वल्लभाई पटेल यशस्वी ठरले. त्यामुळेच भारतीय अखंडतेचे खरे शिल्पकार सरदार वल्लभाई पटेल यांनाच म्हणावे लागेल, असे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रमोद वडते होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, सरदार पटेल यांनी स्वतंत्र भारताला एकसंध बांधण्यासाठी काही संस्थानांना समजावून तर काही ठिकाणी कठोर भूमिका घेऊन भारतात सामील करून घेतले. ही कामगिरी भारतीय अखंडतेच्या दृष्टीने अतिशय मोलाची असून, विद्यार्थ्यांनीही हा राष्ट्रीय एकात्मतेचा वारसा जपण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विनोद भालेराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. लीलाधर खरपुरीये यांनी मानले.

या कार्यक्रमास प्रा. डॉ. धनंजय देवते, प्रा. अनिता गणोरकर, प्रा. सचिन काळे, प्रा. शैलेश हातबुडे, प्रा. सिद्धार्थ चनकापुरे, प्रा. पवन उमक, प्रा. शुभम वाघ, कल्पना देवळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी श्री. अजय अंजनकर, रजनी गणोरकर, अरविंद दहाट, प्रकाश कोकोडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0
0

Leave a Reply

Realted News