डोरली (भिंगारे) शिवारातील ‘‘अंबिका फार्म’’ वर पोलिसांची ‘‘जुगार’’ वर धाड

‘‘अंबिका फार्म’’ वर आठ जुगाऱ्यांना अटक : एसडीपीओ व कळमेश्वर पोलिसांची संयुक्त कारवाई

काटा वृत्तसेवा :  
नागपूर/कळमेश्वर: पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डोरली (भिंगारे) शिवारात असलेल्या अंबिका फार्ममधील ‘डॅफोडील्स विला’ मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) आणि कळमेश्वर पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी (दि. ९) रात्री धाड टाकली. यात पोलिसांनी आठ जुगाऱ्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण २१ लाख ५५ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
                         अटक करण्यात आलेल्या आरोपी जुगाऱ्यांमध्ये शफीक रफीक शेख (रा. वाॅर्ड क्रमांक-१, नवीन बायपास रोड, कळमेश्वर), सचिन पुरुषोत्तम रोकडे (रा. वाॅर्ड क्रमांक-१३, कळमेश्वर), विलास दिगांबर आडे, सुनील ज्ञानेश्वर तडस, सूरज अशोक आढाऊ, रवींद्र मधुकर ढवळे (सर्व, रा. शेंदुरजना (घाट), ता. वरुड, जिल्हा अमरावती), विशाल प्रकाश महात्मे (रा. वरुड, जिल्हा अमरावती) व रोशन रमेश बगाडे (रा. पुसला, ता. वरुड), जिल्हा अमरावती या आठजणांचा समावेश आहे.
                      डोरली (भिंगारे), ता. काटोल शिवारातील अंबिका फार्ममधील डॅफोडील्स विलामध्ये जुगार सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक तथा सावनेरचे एसडीपीओ अनिल मस्के यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या विशेष पथकासह कळमेश्वर पोलिसांनी शुक्रवारी रात्री या प्रत्यक्ष पाहणी केली. बाहेर उभी असलेली वाहने दिसताच पोलिसांना  खात्री पटली आणि त्यांनी लगेच धाड टाकली.
                          यात पोलिसांनी जुगार खेळत असलेल्या आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेत अटक केली व नंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण २१ लाख ५५ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News