April 12, 2025 10:08 am

नागपूरमध्ये भरचौकात गोळी झाडून तरुणाची निर्घृण हत्या

पोलिसांकडून तिघांना अटक, एका आरोपीचा शोध सुरू

नागपूर : नागपूरमध्ये भरचौकात गोळीबार आणि चॉपरने हल्ला करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचे पुढे आले असून या प्रकरणी पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गोधनी प्रकाश नगर परिसरात झालेल्या या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या 4 पैकी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. सोहेल खान असे मृतकाचे नाव आहे.

 

                       मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहरातील गोधनी प्रकाश नगर परिसरात गोविंद लॉनजवळ गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास बाजारात 4 आरोपी गाडीने आले व त्यांनी तेथील ठेल्यांजवळ गाडी थांबविली. तेथील तरुणांना शाहरूख कुठे आहे असे विचारत आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. एकाने देशी पिस्तूल काढत गोळीबारच सुरू केला. त्यातील एक गोळी लागून सोहेल खान (35) नावाचा तरुण जखमी झाला. तर भाजी विकत घेण्यासाठी आलेल्या मो.सुलतान उर्फ मो.शफी याच्या मानेला चाटून गोळी गेली व तोदेखील जखमी झाला. घटनास्थळावर एक जिवंत काडतूसदेखील आढळले. या घटनेमुळे खळबळ उडाली व पळापळ झाली. मानकापूर पोलिस ठाण्याच्या पथकाला याची माहिती देण्यात आली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले व सोहेलला मेयो इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

भाजीच्या गाड्यावरुन वादाची चर्चा

                         मिळालेल्या माहितीनुसार या हत्येप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत धीरज घोडमारे, राजेंद्र मरकाम, आणि भूषण या तिघांना अटक केली आहे. तर चौथा आरोपी चंदू डोंगरे फरार आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले, काही तरुणांकडून घोषणाबाजी करत गाड्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता व पोलिसांना बंदोबस्त तैनात करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News