विदर्भात ४ कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प
३ कोटी रोजगारनिर्मितीची क्षमता — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
का टा वृत्तसेवा : डॉ. अरविंद हरणे
नागपूर : खनिज संपदा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर विदर्भाला देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन बनविण्याची क्षमता आहे. ‘विकसित भारत @२०४७’च्या संकल्पनेत विदर्भ महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आगामी २० वर्षांत खाण क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेत सुमारे अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान देण्यासोबतच देशभरात ३ कोटींपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करू शकते, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे आयोजित खाण अभियंत्यांच्या ३६व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘मायनिंग फॉर विकसित भारत @२०४७’ या राष्ट्रीय परिसंवादाचेही उद्घाटन करण्यात आले. दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष मनीष कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
विदर्भात ५ लाख कोटींची गुंतवणूक
विदर्भात आगामी काळात सुमारे ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० एमटीपीए पोलाद निर्मिती क्षमता उभारण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये खाणकामावर आधारित नवीन औद्योगिक परिसंस्था विकसित होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
चार कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प विदर्भात
केंद्र सरकारच्या नव्या मिशनअंतर्गत प्रस्तावित पहिल्या आठ कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पांपैकी चार प्रकल्प विदर्भात साकारले जाणार आहेत. माजरी येथे प्रस्तावित कोळसा गॅसिफिकेशन हब तसेच ग्रीन स्टील तंत्रज्ञानामुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

नागपूरला ‘मायनिंग कॅपिटल’ करण्याचा मानस
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे (डब्ल्यूसीएल) अध्यक्ष डॉ. हेमंत शरद पांडे यांनी नागपूरला देशाची ‘मायनिंग कॅपिटल’ म्हणून विकसित करण्याचा मानस व्यक्त केला. डब्ल्यूसीएलने १२ खाणींमध्ये कोळशाबरोबरच १८ महत्त्वाची खनिजे आणि दुर्मीळ मृदा मूलद्रव्यांचा शोध घेतला आहे. त्यामुळे भविष्यात कोळशाच्या पलीकडे जाऊन मौल्यवान खनिजांच्या उत्खननावरही भर दिला जाणार आहे.
एआय, ड्रोन आणि ऑटोमेशनचा वापर
खाणकामामुळे कामगार तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऑटोमेशन, ड्रोन, सेन्सर्स आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत आहे. उत्पादनवाढीपेक्षा कामगार आणि स्थानिक नागरिकांची सुरक्षितता सर्वोच्च असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
लिथियम, ग्रेफाइटसह दुर्मीळ खनिजांवर भर
भविष्यात लिथियम, ग्रेफाइट आणि इतर दुर्मीळ खनिजांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ही गरज पूर्ण करताना पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन, शाश्वत खाणकाम, इको-टुरिझम आणि आधुनिक खाण बंद प्रक्रिया यांना प्राधान्य देण्याची गरज केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी, मायनिंग डिव्हिजनचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुमन आणि डॉ. अनुपम खेर यांनी व्यक्त केली.
🚨 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क I डॉ.अरविंद हरणे : 9096157085








