प्रादेशिक सेनेच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त भव्य आयोजन; वीर जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान
का टा वृत्तसेवा : स्वरूप मुडे
नागपूर : रिटायर्ड टेरिटोरियल आर्मी पर्सनल असोसिएशन, नागपूरच्या वतीने प्रादेशिक सेनेचा ७७ वा स्थापना दिन अर्थात प्रादेशिक सेना दिवस एम.ई.एस. आय.बी., झिरो माईल, सीताबर्डी येथे मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देशाच्या सुरक्षेसाठी तसेच विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये प्रादेशिक सेनेने दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत वीर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून मानवंदना देण्यात आली. अतिथींचे स्वागत परेड आणि लेझीमच्या तालात करण्यात आले. तरुण पब्लिक अँड ज्युनिअर कॉलेज, डोंगरगावच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत तसेच सैनिकांच्या जीवनावर आधारित गीतांवर आकर्षक नृत्य सादर केले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून व्हाइस अॅडमिरल किशोर ठाकरे (एन.एस.एम., अति विशिष्ट सेवा मेडल), कर्नल नरसिंहा, कर्नल नितीन राज देशपांडे, कर्नल आयवन सिंग, मेजर कापडिया, गिलानी पाशा यांच्यासह ७१ वॉर फायटर्स उपस्थित होते. व्हाइस अॅडमिरल किशोर ठाकरे यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून सैनिकांचे मनोबल वाढविले. कर्नल नितीन राज देशपांडे आणि मेजर कापडिया यांनी सैन्यातील सेवाकाळातील अनुभव सांगत जबाबदारी पार पाडताना घ्यावे लागणारे निर्णय आणि सैनिकांपुढील आव्हाने यावर प्रकाश टाकला.
यावेळी वीर जवानांच्या कुटुंबीयांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानचिन्ह व घड्याळ देऊन सन्मानित करण्यात आले. सेवानिवृत्त प्रादेशिक सेना सदस्यांच्या गुणवंत मुला-मुलींनाही त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्यात आले.

असोसिएशनचे अध्यक्ष सूबेदार गडपायले, उपाध्यक्ष नायब सूबेदार रामभाऊ डोंगरे, कोषाध्यक्ष सी.एच.एम. तुळशीदास एस. गीरगुरे, सचिव हवालदार विजय पारधी, उपसचिव हवालदार अशोक सिड्डाम, सदस्य हवालदार शेषराव धमगाये, नायब सूबेदार योगनाथ जांभुळकर, हवालदार नितीन गेडाम आणि राजेश अलोने यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची प्रस्तावना हवालदार विजय पारधी यांनी केली. नायब सूबेदार क्लार्क शुक्ला यांनी प्रादेशिक सेनेचा इतिहास सांगितला. ज्योत्स्ना बनसोड यांनी सूत्रसंचालन केले, तर नायब सूबेदार रामभाऊ डोंगरे यांनी आभार मानले.

या सोहळ्यासाठी राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्ली येथील सेवानिवृत्त प्रादेशिक सेना सदस्य आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. ११८ इन्फंट्री बटालियन, प्रादेशिक सेना, भुसावळ येथून सूबेदार प्रवीण ठाकरे यांच्यासह पाच ओआर सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक सेना रिटायर्ड पर्सनल महिला बचत गट आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.







