♦फहीम खानच्या घर पाडकामाला स्थगिती, न्यायालयाने महापालिकेला फटकारले
नागपूर : नागपूर दंगलीसाठी कारणीभूत असलेला नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान शमीम खान (३८, संजयबाग कॉलनी, यशोधरानगर) याचे घर पाडायला महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सकाळी ११ वाजता सुरुवात केली. तीन जेसीबी या पाडकामासाठी लावले होते. नोटीस मिळाल्यानंतर फहीम खान याच्या घरच्यांनी रविवारी रात्रीच घर रिकामे केले होते.
फहीम खानचे घर पाडण्याची नोटीस महानगरपालिकेच्या आसीनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांनी रविवारी बजावली. या सूचनेत दोनमजली घरात सुमारे ८६.४८ चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम २४ तासांच्या आत पूर्णपणे पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. २४ तासांत कार्यवाही पूर्ण न झाल्यास महापालिकेला कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आसीनगर झोनचे अतिक्रमणविरोधी पथक दाखल झाले.
सर्वप्रथम डेली निड्सचे दुकान, त्यानंतर कंपांउड वाॅल पाडण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दुमजली घर पाडण्यात आले. या वेळी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिस, माध्यमांचे प्रतिनिधी व अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाही परिसरात प्रवेश नव्हता. संजयबाग कॉलनीकडे येणारे चारही बाजूचे रस्ते लोखंडी कठडे लावून बंद करण्यात आले होते, तर आजूबाजूच्या इमारतींवर पोलिस तैनात करण्यात आले होते.
24 तासांच्या आत बांधकाम पाडण्याचे होते पालिकेला निर्देश
राज्य प्रादेशिक नियोजन आणि नगररचना कायदा, १९६६ च्या कलम २ (१५) २ (१९) अंतर्गत आसीनगर झोन कार्यालयाचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांनी रविवारी हा आदेश जारी केला होता. घर फहीम खानची आई झहिरुन्निसा शमीम खान आहे. नासुप्रने ३० वर्षांच्या लिजवर त्यांना हा भूखंड दिला होता. दुमजली घराच्या पहिल्या मजल्यावर ४३.२४ चौरस मीटर आणि दुसऱ्या मजल्यावर ४३.२४ चौरस मीटरसह ८६.४८ चौरस मीटर क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम आढळून आले. अशा परिस्थितीत महापालिका प्रशासनाने नोटीस बजावून २४ तासांच्या आत बांधकाम पाडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बांधकाम पाडण्यात आले. आता याची चर्चा होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिला होता बुलडोझर चालवण्याचा इशारा
दंगेखाेरांना आताच सरळ केले नाही तर त्यांना दंगे करण्याची सवय लागेल. त्यांना कुठल्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी शनिवार, २४ मार्च रोजी नागपूर येथे आयोजित पत्रपरिषदेत केले होते. बुलडोझर चालवण्याची आवश्यकता पडेल तिथे चालवू असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानंतर लागलीच महापालिकेने नोटीस बजावत घर पाडले. नागपुरातील दंग्यात झालेले सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल आणि त्यांनी नुकसानभरपाई दिली नाही तर त्यांची प्राॅपर्टी विकली जाईल, अशी मोठी घोषणाही फडणवीस यांनी केली.
उच्च न्यायालयाची स्थगिती, नोटीस मिळेपर्यंत पाडून टाकले
दंगलीसाठी कारणीभूत असलेला नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान शमीम खान याचे घर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी नेस्तनाबूत केले. या पाडकामाविरुद्ध फहीम खान शमीम खान याच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली. दुपारी ३ वाजता न्या. नितीन सांबरे व न्या. वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने घर पाडण्याच्या कारवाईला स्थगिती दिली. परंतु तत्पूर्वीच फहीम खान शमीम खान याचे घर नेस्तनाबूत झाले होते. उच्च न्यायालयाने महापालिकेला नोटीस बजावली असून राज्याच्या मुख्य सचिवांना येत्या १५ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर महापालिकेकडून सुरू असलेल्या घर पाडण्याच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून स्थगिती देण्यात आली आहे. या कारवाई विरोधात फहीम खानच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाची स्थगिती येण्यापूर्वीच फहीम खानचे घर जमीनदोस्त झाले होते. मात्र आता पाडकामाला स्थगिती मिळाली आहे. नागपूरमधील यशोधरा नगर येथील संजय बाग कॉलनीमध्ये असलेले हे घर फहीम खान यांच्या आईच्या नावावर आहे. इमारत आराखडा मंजुरी तील अनियमिततेबाबत महापालिकेने नोटीस बजावली होती. स्वतःहून बेकायदेशीर बांधकाम हटवण्यासाठी 24 तासांचा वेळ दिला होता, जो आज पूर्ण झाला. त्यानंतर महापालिकेकडून त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला.
महापालिकेला आपली बाजू मांडण्याचे निर्देश
या कारवाईविरोधात फहीम खानच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. महापालिकेकडून अतिक्रमण कारवाई विषयी सुप्रीम कोर्टाच्या नव्या गाईडलाईनचे उल्लंघन होत असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. त्यावर तत्काळ सुनावणी करत न्यायालयाने महापालिकेकडून सुरू असलेल्या पाडकाम कारवाईला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने जेसीबीने सुरू असलेल्या पाडकामाला स्थगिती दिली असून एक आठवड्यात महापालिकेला आपली बाजू मांडण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे, फहीम खानसह कुटुंबीयांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून येते.