♦ फहीम खानच्या घर पाडकामाला स्थगिती, न्यायालयाने महापालिकेला फटकारले
नागपूर : नागपूर दंगलीसाठी कारणीभूत असलेला नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान शमीम खान (३८, संजयबाग कॉलनी, यशोधरानगर) याचे घर पाडायला महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सकाळी ११ वाजता सुरुवात केली. तीन जेसीबी या पाडकामासाठी लावले होते. नोटीस मिळाल्यानंतर फहीम खान याच्या घरच्यांनी रविवारी रात्रीच घर रिकामे केले होते.
फहीम खानचे घर पाडण्याची नोटीस महानगरपालिकेच्या आसीनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांनी रविवारी बजावली. या सूचनेत दोनमजली घरात सुमारे ८६.४८ चौरस मीटर क्षेत्रफळाचे बांधकाम २४ तासांच्या आत पूर्णपणे पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. २४ तासांत कार्यवाही पूर्ण न झाल्यास महापालिकेला कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आसीनगर झोनचे अतिक्रमणविरोधी पथक दाखल झाले.
सर्वप्रथम डेली निड्सचे दुकान, त्यानंतर कंपांउड वाॅल पाडण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दुमजली घर पाडण्यात आले. या वेळी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिस, माध्यमांचे प्रतिनिधी व अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाही परिसरात प्रवेश नव्हता. संजयबाग कॉलनीकडे येणारे चारही बाजूचे रस्ते लोखंडी कठडे लावून बंद करण्यात आले होते, तर आजूबाजूच्या इमारतींवर पोलिस तैनात करण्यात आले होते.
24 तासांच्या आत बांधकाम पाडण्याचे होते पालिकेला निर्देश
राज्य प्रादेशिक नियोजन आणि नगररचना कायदा, १९६६ च्या कलम २ (१५) २ (१९) अंतर्गत आसीनगर झोन कार्यालयाचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांनी रविवारी हा आदेश जारी केला होता. घर फहीम खानची आई झहिरुन्निसा शमीम खान आहे. नासुप्रने ३० वर्षांच्या लिजवर त्यांना हा भूखंड दिला होता. दुमजली घराच्या पहिल्या मजल्यावर ४३.२४ चौरस मीटर आणि दुसऱ्या मजल्यावर ४३.२४ चौरस मीटरसह ८६.४८ चौरस मीटर क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम आढळून आले. अशा परिस्थितीत महापालिका प्रशासनाने नोटीस बजावून २४ तासांच्या आत बांधकाम पाडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बांधकाम पाडण्यात आले. आता याची चर्चा होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिला होता बुलडोझर चालवण्याचा इशारा
दंगेखाेरांना आताच सरळ केले नाही तर त्यांना दंगे करण्याची सवय लागेल. त्यांना कुठल्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी शनिवार, २४ मार्च रोजी नागपूर येथे आयोजित पत्रपरिषदेत केले होते. बुलडोझर चालवण्याची आवश्यकता पडेल तिथे चालवू असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानंतर लागलीच महापालिकेने नोटीस बजावत घर पाडले. नागपुरातील दंग्यात झालेले सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल आणि त्यांनी नुकसानभरपाई दिली नाही तर त्यांची प्राॅपर्टी विकली जाईल, अशी मोठी घोषणाही फडणवीस यांनी केली.









