♦ सांगली येथील भयंकर घटना
♦ लाकडी खुंट्याने मारहाण करत निर्दयी बापाने घेतला मुलीचा जीव
सांगली : ‘नीट’ परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने शिक्षक असलेल्या निर्दयी बापाने पोटच्या मुलीला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत या 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सांगलीच्या आटपाडी गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली असून मुलीच्या आईने फिर्याद दिली होती.
प्रकरणातील अधिकची माहिती अशी की, मुलगी साधना भोसले (17) ही आटपाडी येथे बारावीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. तिचे वडील धोंडीराम भोसले हा मुख्याध्यापक आहे. साधनाला बारावीच्या चाचणी परीक्षेत कमी मार्क मिळाले होते याची माहिती वडिलाला कळताच त्याचा संताप अनावर झाला. शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास बापाने साधनाला रागावण्यास सुरू केले. त्यानंतर संतापलेल्या बापाने लाकडी खुंट्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली व त्यातच तिचा मृत्यू झाला.
