नोंदणीकृत शेतकरी अजूनही धान बोनसच्या प्रतीक्षेत !
शासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा : शेतकऱ्यांप्रती एवढी उदासीनता का?
का टा वृत्तसेवा I संजय मते
आंधळगाव : भंडारा जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रांवर नोंदणीकृत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला बोनस अजूनही मिळालेला नाही, यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. ते शेतकरी अजूनही धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्य शासनाने नागपूर हिवाळी अधिवेशनात धान उत्पादकांसाठी हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस आणि दोन हेक्टरपर्यंत मर्यादा अशी घोषणा केली होती. या योजनेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल १,८०० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला होता. भंडारा जिल्ह्याला यंदा २१३ कोटी १२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे आणि ही रक्कम जिल्हा मार्केटिंग विभागाच्या खात्यात जमा झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रक्कम जमा झाली तरी खात्यावर वाटप नाही
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केली असून, अनेकांनी प्रत्यक्षात आधारभूत केंद्रावर धानदेखील विकले आहे. मात्र, फक्त केंद्रावर प्रत्यक्ष धान विकणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, बाकीच्यांच्या खात्यात बोनसची रक्कम पोहोचलेली नाही. जिल्हा मार्केटिंग विभागाच्या मते, खरेदी केंद्रांकडून शेतकऱ्यांच्या पावत्या, अहवाल प्राप्त होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम ऑनलाइन जमा केली जाणार आहे.
