विधी सेवा समिती व कनिष्ठ न्यायालय कळमेश्वर चा उपक्रम
का टा वृत्तसेवा I भुषण सवाईकर
कळमेश्वर : आज ग्रामपंचायत कार्यालय वरोडा येथे कायदे विषयक माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले विधी सेवा समिती व कनिष्ठ न्यायालय कळमेश्वर येथील प्रधान न्यायाधीश मा. रविंद्र .एल. राठोड, ॲड. हेमंत ताजने, अध्यक्ष बार असोसिएशन कळमेश्वर, ॲड. हर्षल यावलकर, ॲड. आकाश काळे सरकारी वकील, कळमेश्वर बार असोसिएशनचे सचिव ॲड. निलेश अंजनकर, यांचेसह सा.‘कामगार टाइम्स’ चे संपादक महेंद्र शेंडे, विधी सेवा समिती सदस्य आशिष देशमुख, अण्णाजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्यां कविता हिंगणकर, सरपंच संगीता वासनिक हे मंचकावर उपस्थित होते.
सर्वप्रथम कळमेश्वर न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश मा. रविंद्र एल. राठोड यांचे हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुजन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली.

कळमेश्वर बार असोसिएशनचे सचिव ॲड. निलेश अंजनकर यांनी बाल गुन्हेगारी अर्थात 18 वर्षांखालील एखाद्या व्यक्तीने गुन्हा केल्यास त्याला बालगुन्हेगार म्हटले जाते. बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 या कायद्यानुसार, बालगुन्हेगारांविषयी प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे कारवाई केली जात नाही. गंभीर गुन्हे (जसे खून, बलात्कार) केल्यास 16-18 वयोगटातील मुलावर प्रौढ गुन्हेगारासारखी चौकशी होऊ शकते. पोलिस FIR दाखल करतात, बाल न्याय मंडळ समोर सुनावणी दंडात्मक शिक्षेऐवजी सुधारणा केंद्रात पाठवले जाते. यांसह बाल गुन्हेगारीच्या संदर्भाने कायदेशीर अधिकारांबद्यल सविस्तर मार्गदर्शन केले.
ॲड. हर्षल यावलकर यांनी दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हे संदर्भात मार्गदर्शन करतांना पोलीसांकडून अकारण त्रास देणे, मारहाण करणे व अटक न करता दिवसभर पोलीस स्टेशनला बसवून ठेवणे, असे प्रकार सर्रास केले जातात. यावर घडलेल्या गुन्ह्यांचे गांभीर्य व गुन्हेगारांचे अधिकारा संबंधाने विस्तृत माहीती दिली. दखलपात्र गुन्हे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे, पोलीस तक्रार नोंदवल्याशिवाय अटक करू शकतात. (उदा: खून, बलात्कार, अपहरण, दरोडा) अदखलपात्र गुन्हे, कमी गंभीर गुन्हे: पोलीस न्यायालयाच्या परवानगीशिवाय अटक करू शकत नाहीत. उदा : शिवीगाळ, किरकोळ मारहाण, बदनामी संदर्भाने कायदेशीर अधिकारांबद्यल सविस्तर मार्गदर्शन केले.

ॲड. हेमंत ताजने, अध्यक्ष बार असोसिएशन यांनी ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण व कल्याण कायदा, 2007 (Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act- 2007) यांवर मार्गदर्शन केले. उद्देश : वडिलधाऱ्या व्यक्तींना मूलांकडून आर्थिक आणि मानसिक आधार मिळावा. मुख्य तरतुदी: मुलांनी आपल्या वृद्ध पालकांचे पालनपोषण करणे कायदेशीर बंधनकारक आहे. जर मुलांनी पालनपोषण न केल्यास, पालक जिल्हा न्यायालयात तक्रार करू शकतात. न्यायालय दरमहा रू. 10,000 पर्यंत भत्त्याचे आदेश देऊ शकते. वृद्धाश्रमांची स्थापना आणि व्यवस्थापनासाठी राज्य सरकारला जबाबदारी ही सुद्धा तरतूद यात असल्याचे ॲड. हेमंत ताजने म्हणाले.
यावेळी ॲड. ताजने यांनी ‘वरोडा ग्रामपंचायत’ तालुक्यात उत्कृष्ट ग्रामपंचायत असून कर्तव्यदक्ष सरपंच संगिता वासनिक यांच्या कार्याची प्रशंसा केली. सोबतच भविष्यात कोणत्याही समारंभात पाहुण्यांचे स्वागत ‘हार किंवा पुष्पगुच्छ’ देवून न करता, त्याऐवजी फळझाडाचे रोपटे देवून सत्कार करण्याचे, ज्यायोगे हरितक्रांती व पर्यावरण संवर्धनाची भावना वाढीस लागेल. वृक्षारोपणाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन ॲड. ताजने यांनी केले.

आपले अध्यक्षीय व समारोपीय भाषणात प्रधान न्यायाधीश मा. रविंद्र एल. राठोड यांनी प्रत्येकाला आपले कायदेशीर अधिकारांची जाणीव असली पाहीजे यावर भर दिला. नाबरिकांनी गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहावे. अनवधानाने गुन्हा घडल्यास गंभीर दखलपात्र व अदखलपात्र गुन्हयासंबधाने पोलीसी अटकेसंदर्भाने आपल्या अधिकाराची जाणिव नागरिकांना व्हावी, यासाठी कायदेविषयक जनजाग्तीसाठी अशा शिबीरांचे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या गावांमधून आयोजन केले जात असल्याचे ते म्हणाले. न्यायाधीशांनी वरोडा ग्रामपंचायतच्या सरपंच संगिता वासनिक यांचे कायदेविषयक जनजागृती शिबीराचे उत्कृष्ट आयोजनासाठी तसेच कार्यक्रमाचे संचालनासाठी कौतुक केले.

कार्यक्रमाला प्रामुख्याने विधी सेवा समिती सदस्य पत्रकार आशिष देशमुख, अण्णाजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्यां कविता हिंगणकर, पत्रकार भूषण सवाईकर, सामाजिक कार्यकर्ते धर्माजी पाटील, उपसरपंच हिरालाल डाखोळे, सदस्य मिलिंद राऊत, घनश्यामची खडसे, प्रतिष्ठित नागरिक पुंडलिकजी बांबल, शांताराम जी हिवरे, माजी सरपंच भीमरावजी डाखोडे, खुशाल खडसे, गीता हिवरे, सुनिता खोरगडे, जि. प. शाळा मुख्याध्यापिका पुष्पलता नारनवरे, अंगणवाडी सेविका रविता वासनिक, पद्मा राऊत, शोभाताई सिंदूरकर, आकाश पिंपळकर इ. सह अनेक गावकरी उपस्थित होते.

वरोडा ग्रामपंचायतच्या सरपंच संगिता वासनिक यांनी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे प्रास्ताविकात नागरिकांनी कायदेशीर व शिस्तप्रिय जीवन अंगीकारण्याचे आवाहन केले. मोबाईल फोन, वाहनाची चाबी हिसकावणे, अधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशांवर धमकावून जबरीने वसूली करण्याचे प्रकार काही उपद्रवी पोलीसांकडून कर्तव्यावर किंवा कर्तव्याचे ठिकाणी नसतांनाही केले जातात. लहानमोठया मालवाहतूक करणाऱ्यांकडून तसेच दुचाकी वाहनधारकांकडून अवैध वसुली करण्यासारखे गैरप्रकार सर्रास चालत असतांत. यांवर आळा बसण्यासाठी कायदेविषयक किमान ज्ञान आवश्यक असून, गैरप्रकार किंवा अन्यायकारक, बेकायदेशीर वागणूक देणारा शासनाचा कोणत्याही विभागाचा कर्मचारी किंवा अधिकारी असो त्याचे विरूद्ध पोलीसात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई करता येते. त्यासाठी आपणही कायद्याचा, शिस्तीचा अंगिकार केला पाहीजे. असेही त्या म्हणाल्या.
कायदेविषयक मोलाचे मार्गदर्शनासाठी न्यायाधीश मा. रविंद्र .एल. राठोड, ॲड. हेमंत ताजने, अध्यक्ष बार असोसिएशन कळमेश्वर, ॲड. हर्षल यावलकर, कळमेश्वर बार असोसिएशनचे सचिव ॲड. निलेश अंजनकर व पाहुण्यांचे, ग्रामपंचायत वरोडाच्या वतीने सरपंच संगिता वासनिक यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी गोविंदा राऊत, पिंटू निकोसे, रामचंद्र भोयर, ज्ञानेश्वर डाखोळे, यांनी मोलाचे सहकार्य केले.












