बुलढाणा विधानसभा निकालावर प्रश्नचिन्ह ?
मतचोरी झाल्याचा जयश्री शेळके यांचा आरोप, न्यायालयासमक्ष फेरमोजणीची मागणी
नागपूर : शिवसेना ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. जयश्री शेळके यांनी आपल्या अर्जात या मतदारसंघातील मतमोजणीवर आक्षेप घेत निवडणूक याचिका दाखल केली असून, फेरमोजणीची मागणी केली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ही याचिका फेटाळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, शेळके यांनी गायकवाड यांचा अर्ज निराधार असल्याचे सांगत आपल्या याचिकेवर गुणवत्तेच्या आधारावर निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड हे अवघ्या 841 मतांनी निवडून आले आहेत. केवळ 800 मतांच्या फरकामुळे ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी मतमोजणीवर आक्षेप घेत, मतमोजणी प्रक्रियेत अनेक अनियमितता झाल्याचा दावा केला आहे.
जयश्री शेळकेंनी याचिकेत काय म्हटले?
“जयश्री शेळके यांच्या मते, मतदार यादीमध्ये 3 हजार 561 बोगस नावे होती. अनेक मतदारांची नावे दोन किंवा अधिक ठिकाणी होती आणि काही ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावावरही मतदान झाले. त्यामुळे, सर्व ईव्हीएम न्यायालयात आणून न्यायालयासमक्ष पुन्हा मोजणी केली जावी, अशी त्यांची मागणी आहे.”
याशिवाय शेळके यांनी मतदारसंघाची संपूर्ण मतदारयादी, मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज, गायकवाड यांचे विजयाचे प्रमाणपत्र तसेच इतर संबंधित कागदपत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी स्वतंत्र मागणीही केली आहे. या प्रकरणात त्यांच्यावतीने ॲड. आकाश मून यांनी युक्तिवाद केला.
जयश्री शेळकेंच्या याचिकेविरोधात गायकवाडांचा अर्ज
जयश्री शेळके यांनी संजय गायकवाड यांच्या विजयाला आव्हान देत निवडणूक याचिका दाखल केल्यानंतर, संजय गायकवाड यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेतील ऑर्डर 7, नियम 11 अंतर्गत अर्ज दाखल करून ही याचिका फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. मात्र, शेळके यांनी त्याला उत्तर देताना, संजय गायकवाड यांचा अर्ज गुणवत्ताहीन व निराधार आहे. त्यामुळे निवडणूक याचिकेवर गुणवत्तेच्या आधारावर निर्णय देण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा जयश्री शेळके यांचा आरोप?
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड यांना 91 हजार 660 मते मिळाली. तर ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांना 90 हजार 819 मते मिळाली. संजय गायकवाड हे अवघ्या 841 मतांनी विजयी झाले होते. दरम्यान, काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर जयश्री शेळके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, न्यायालय काय निर्णय देते हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.













Users Today : 3
Users Yesterday : 11