* खापा येथील कर्करोग निदान व उपचार शिबिरात 311 कर्करोग संशयितांची तपासणी. * आमदार डॉ आशिष देशमुख यांचे कॅन्सरमुक्त अभियान.
का टा वृत्तसेवा :
खापा :- प्रारंभिक तपासणीत कर्करोगानी बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसत असून जनतेने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोग निदानासाठी मॅमोग्राफी व पॅप स्मिअर तपासणी या शिबिरात करण्यात येत असून तरुण वर्गासह सर्वांचीच मुख कर्करोग तपासणी सुद्धा करण्यात येत आहे. विविध प्रकारच्या कर्करोगाशी संबंधित विशेषज्ञांची चमू या शिबिरात सेवा देत आहे. यात ही धक्कादायक बाब पुढे आली आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ आशिष देशमुख यांनी 17 मार्चला प्राथमिक आरोग्य केंद्र खापा येथे आयोजित कर्करोग निदान व उपचार शिबिरात केले.
कॅन्सर मुक्त अभियानांतर्गत आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, खापा येथे कर्करोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध विभागातील 311 कर्करोग संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. कर्करोगाची स्पष्ट लक्षणे असलेल्या 160 रुग्णांना पुढील उपचारासाठी रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, हिंगणा रोड, नागपूर, लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (रुग्णालय) येथे रेफर करण्यात आले आहे.
रणजीत देशमुख दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अभय कोलते यांनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले. एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटलचे सामाजिक वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ अनिरुद्ध देवके यांनी प्रास्ताविक केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, शासकीय दंत महाविद्यालय नागपूर, सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूर, जिल्हा परिषद नागपूर (आरोग्य विभाग), नगर परिषद आरोग्य विभाग सावनेर, कळमेश्वर, रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, हिंगणा रोड, नागपूर, एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सावनेर व कळमेश्वर तालुक्यात कॅन्सरमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. 17 फेब्रुवारी 2025 ते 19 एप्रिल 2025 पर्यंत चालणाऱ्या या अभियानाचे आयोजक सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचे आमदार डॉ आशिष देशमुख आहेत.
कर्करोग, स्त्रीरोग, शल्यचिकित्सा, कान/नाक/घसा, मेडिसिन, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग व दंतरोग विभागातील विशेषज्ञांनी या शिबिरात आपल्या सेवा प्रदान केल्या. यावेळी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहिते, झिम लॅबोरेटरीचे उपाध्यक्ष ब्रिजेश बिष्ट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण जाधव, रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर्स तसेच खापा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढील कर्करोग निदान व उपचार शिबिर तसेच इतर सर्व प्रकारच्या रुग्णांचे तपासणी शिबीर 21 मार्चला प्राथमिक आरोग्य केंद्र तिष्टी येथे संपन्न होईल.