मोहपा येथे सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहात साजरा
का टा वृत्तसेवा I संजय गणोरकर
मोहपा : येथील गजानन सभागृहात सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिनाचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी अधीक्षक अभियंता दीपक श्रोते होते.
“तर्कवादी व्हा, प्रबुद्ध भारत घडवा” – दीपक श्रोते
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रोते म्हणाले, “समाजात कोणतीही घटना घडली तर आपण तर्कवादी न राहता प्रश्न विचारत नाही. त्यामुळे भारतीय बहुजन समाज दिवसेंदिवस मागे पडत आहे. जोतिबा फुले यांनी दिलेला तर्कवादाचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण प्रश्न विचारण्याची सवय लावली पाहिजे. समाजातील वाईट चालीरीती, अंधश्रद्धा, व्यसन, धार्मिक कर्मकांड यांचा शोध घेऊन त्यावर प्रश्न विचारल्यासच आपण खऱ्या अर्थाने सत्यशोधक बनू शकतो आणि प्रबुद्ध भारताच्या निर्मितीकडे वाटचाल करू शकतो,” असे ते म्हणाले.
विद्यार्थी समाजाचा कणा, प्रश्न विचारण्याची गरज : डॉ. राऊत
प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत राऊत यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “विद्यार्थी हा समाजाचा कणा आहे. शिक्षण घेताना गुरूजन, पालक आणि वडीलधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची सवय लावली पाहिजे. प्रश्न विचारले नाहीत तर; आपली सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक अधोगती होत आहे.” त्यांनी जोतिबा फुले यांच्या “शेतकऱ्याचा आसूड” या ग्रंथातील विचारांचा दाखला देत विद्यार्थ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन केले.
फुले-आंबेडकरांच्या विचारांनीच समाज प्रगतिपथावर : डॉ. गजबे
डॉ. विलास गजबे यांनी जोतिबा फुले यांच्या गुलामगिरी, सत्यशोधक समाज आणि शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथांचा संदर्भ देत सांगितले की, “फुले यांचे विचारच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत प्रतिबिंबित केले आहेत. संविधानातील मूलभूत अधिकार, आरक्षण, हिंदू कोड बिल यांसारख्या कलमांमुळे समाज प्रगतिपथावर आला आहे. मात्र आज काही जातीयवादी व धर्मांध प्रवृत्ती संविधानात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सत्यशोधक मंडळींनी सजग राहून फुले यांचे विचार समाजात प्रसारित केले पाहिजेत.”
कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा शोभाताई कौटकर, म. फुले वाचनालयाचे अध्यक्ष त्र्यंबक राऊत, म. फुले स्टडी सर्कलचे अध्यक्ष डॉ. प्रशांत महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक श्रीराम रंगारी यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. प्रशांत महाजन यांनी करून दिली. सूत्रसंचालन सरिता आंजनकर यांनी तर आभारप्रदर्शन मंदार कौटकर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत डांगोरे, अरुणा डांगोरे, जयदेव बेलसरे आदींनी प्रयत्न केले.













Users Today : 3
Users Yesterday : 11