सावनेर येथे २ ऑक्टोबरला भव्य दसरा मेळावा
आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या मनोगतावर सर्वांचे लक्ष
सावनेर : ‘विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन’ या भारतीय संस्कृतीतील पराक्रम व परिवर्तनाचे प्रतीक असलेल्या पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी, महाराष्ट्र यांच्या वतीने आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात गुरुवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता नगरपरिषद मैदान, सावनेर येथे भव्य दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सावनेर-कळमेश्वर विकास आराखड्याचा मेळाव्यात होणार ऊहापोह
या मेळाव्यात सध्याची राजकीय परिस्थिती, राज्यातील घडामोडी, नागपूर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा, सावनेर नवनिर्माण तसेच सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचा विकास अशा विविध विषयांवर आमदार डॉ. देशमुख आपले प्रखर विचार मांडणार आहेत. “विकासाचे राजकारण केल्यास सर्व समाजाचे भले होईल”, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
समाजहिताचे “विकासाचे राजकारण”
जनतेने दिलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे आमदार देशमुख यांची आतापर्यंतची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. विकासाचा झपाटा कायम ठेवत जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले आहे. त्यामुळे या मेळाव्यात ते काय भूमिका आणि विचार मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या कार्यक्रमाला डॉ. राजीव पोतदार (भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य), मनोहर कुंभारे (जिल्हाध्यक्ष, काटोल), रामराव मोवाडे (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष), मंदार मंगळे (सावनेर शहर मंडळ अध्यक्ष), तेजस्विनी लाड (सावनेर शहर महामंत्री), रितेश सूर्यवंशी (सावनेर शहर महामंत्री) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सावनेर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











