कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध देऊन चौघांनी केला अत्याचार
पुणे :: फेसबुकवर ओळख झालेल्या कांदीवली येथील एका तरुणाने ३३ वर्षीय महिलेस लग्न करण्याचे अमिष दाखवले. त्यानंतर तिच्याशी बाेलणे करुन तिचा विश्वास संपादन करुन तिला भेटण्यास बाेलवून तिला काेल्ड्रींक्स मधून गाेळ्या मिक्स करुन गुंगीचे औषध दिले. त्यानंतर आराेपी व त्याच्या तीन मित्रांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आराेपींवर काळेपडळ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर आराेपींनी पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिचे नग्न फाेटाे व व्हिडिओ देखील काढले. त्या आधारावर महिलेस ब्लॅकमेल करुन तिचे नग्न फाेटाे साेशल मिडियावर व्हायरल करुन तिचा बदनामी करण्याची धमकी दिली. तिच्याकडे पैशाची मागणी करत दहा लाख रुपये राेख स्वरुपात आराेपींनी घेतले. त्यानंतर महिलेच्या नावावर वेगवेगळ्या बँकेत तब्बल १८ लाख रुपयांचे कर्ज काढून आराेपींनी सदर पैसे घेऊन तिला आणखी पैसे देण्याची मागणी केली.
महिलेने सुरुवातीला घेतलेल्या पैशाची मागणी आराेपींकडे केली असता त्यांनी तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पिडित महिलेने पाेलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर चार आराेपींवर बलात्कार , धमकावणे, फसवणूक आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.