विकसित भारत स्पर्धेंतर्गत निवड, आज-उद्या करणार ‘एक देश एक निवडणूक’ विषयाची मांडणी
नांदगाव पेठ : नांदगाव पेठ उत्कृष्ट वक्तृत्वशैली असलेल्या नांदगाव पेठ येथील भक्ती अरविंद देशमुखने केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय व नेहरू युवा केंद्राद्वारे आयोजित ‘विकसित भारत राष्ट्रीय युवा संसद-२०२५’ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या उपक्रमासाठी तिची निवड झाल्यामुळे ३ एप्रिलपूर्वी देशाच्या संसदेत भक्ती देशमुख यांचा आवाज गुंजणार आहे. ती ‘एक देश एक निवडणूक’ या विषयावर विचार मांडणार आहे.
नांदगाव पेठ येथील श्रीरामचंद्र संस्थानचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांची कन्या भक्तीने पुन्हा एकदा नांदगाव पेठसह अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दिल्लीच्या संसद भवनात १ एप्रिलपासून युवा संसद सुरू झाली आहे. देशभरातील ७५ हजारांहून अधिक तरुणांनी भाग घेतला. त्यानंतर हैदराबाद येथे जिल्हास्तरावर निवड झालेल्या १५० तरुणांमध्ये भक्तीने प्रथम आली.
तेलंगणामधील १३ जिल्ह्यातील प्रथम दहा युवांनी राज्यस्तरीय संसदेत सहभाग घेतला. दोन दिवस चाललेल्या या संसदेत १३० युवकांमध्ये भक्ती प्रथम आली आणि आता ती राष्ट्रीय स्तरावर तेलंगणा राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. ती सध्या हैदराबादच्या प्रतिष्ठित केंद्रीय विश्वविद्यालयात पीएचडी करत आहे.