मतचोरीच्या आरोपांवरून रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
“थेट बोली लावून भाजप उमेदवारांना विजयी करा” असा खोचक टोला
मुंबई रू राज्यातील 23 नगरपालिका आणि 76 नगरपंचायतींच्या 154 जागांसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडली. अशात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी महायुतीकडून पैशांचा वापर, मतदारांची पळवापळवी आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यावरून त्यांनी राज्य निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे.
कालच्या मतदानादरम्यान राज्यातील विविध भागांत धक्कादायक प्रकार समोर आल्याचे पवार यांनी सांगितले. मराठवाड्यातील नांदेडच्या धर्माबाद येथे तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे मतदारांना पैशांचे आमिष दाखवून लग्नाच्या हॉलमध्ये कोंडून ठेवण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
![]()
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर थेट आरोप केले आहेत. अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदे गटाच्या सेनेकडून 200 बोगस मतदार आणल्याचा भाजपाचा आरोप असतानाच, भाजपच्या उमेदवारांकडून मतदारांना पैसे वाटताना दोन जणांना पकडून भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजपकडून शेकडो मतदारांना पैशांचे आमिष दाखवून कोंडून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
लोकशाहीचे असे उघडपणे उल्लंघन होत असताना राज्य निवडणूक आयोग डोळेझाक करत असल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “निवडणुका घेण्याचा फार्स कशासाठी? थेट बोली लावून भाजपच्या उमेदवारांना विजयी घोषित करा. त्यामुळे किमान सरकारी तिजोरीतील पैसा तरी वाचेल,” असा खोचक टोला त्यांनी निवडणूक आयोगाला लगावला आहे.
![]()
या आरोपांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, निवडणूक आयोगाची भूमिका काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.