महाराष्ट्रातील 288 नगरपालिकांचे निकाल जाहीर

महाराष्ट्रातील 288 नगरपालिकांचे निकाल जाहीर
महायुतीचा मोठा विजय, भाजप सर्वात मोठा पक्ष, मविआचा दारुण पराभव

मुंबई / नागपूर : महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी मंगळवारी पार पडली असून, या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीने महाविकास आघाडीचा (मविआ) पार धुव्वा उडवला आहे. अनेक ठिकाणी महायुतीतील तीनही घटक पक्षांमध्येच थेट लढत झाली असतानाही महायुतीने एकूणच या निवडणुका आपल्या खिशात घातल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार, महायुतीचे तब्बल 224 नगराध्यक्ष निवडून आले आहेत, तर महाविकास आघाडीला केवळ 51 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष

नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाने 129 नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. भाजपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 58 जागा, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 37 जागा जिंकत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे.

महाविकास आघाडीची पिछेहाट

महाविकास आघाडीला या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसला असून राज्यात काँग्रेसचे:  31 नगराध्यक्ष, शिवसेना (ठाकरे गट): 10 नगराध्यक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे  10 नगराध्यक्ष निवडूण आले आहेत. अनेक पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्येही महावि ला पराभवाचा सामना करावा लागल्याने पक्षांतर्गत आत्मपरीक्षण सुरू झाले आहे.

काँग्रेस नेत्यांना मोठे धक्के

या निवडणुकांत काँग्रेसला अनेक ठिकाणी मोठे राजकीय धक्के बसले आहेत.

                         सावनेर नगरपरिषदेत भाजपने 23 पैकी 21 जागांवर विजय मिळवत काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा धक्का दिला. मुख्य म्हणजे सावनेर या त्यांच्या बालेकिल्ल्यात, त्यांच्या मुळ गावात कॅाग्रेसला भोपळा मिळाला. काँग्रेसचे सर्वच उमेदवार पराभूत झाले. सावनेरमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजना मंगळे विजयी झाल्या. सावनेरमध्ये भाजपचे २३ पैकी २१ नगरसेवक आणि स्थानिक आघाडीचे ०२ नगरसेवक निवडून आले आहेत.

                         कळमेश्वर नगरपरिषदेत भाजपचे अविनाश माकोडे नगराध्यक्षपदी विराजमान झाले असून त्यांनी शिवसेनेचे झुंजार उमेदवार ब्रिजलाल रघुवंशी यांचा अवघ्या 404 मतांनी पराभव केला आहे. काॅगे्रसच्या उमेदवार माजी न. प. उपाध्यक्ष जोत्सना मंडपे या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कळमेश्वर नगरपरिषदेत भाजपने 21 पैकी 15 जागांवर तर काॅंग्रेसने सहा जागांवर विजय पटकावला आहे.

खापा येथे देखील भाजपने विजयाचा झेंडा रोवला आहे. भाजपचे पियुष बुरडे खापा येथून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले असून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कळमेश्वर व खापा येथे काँग्रेस तिसऱ्या नंबरवर फेकल्या गेली.

 नागपूर जिल्यातील मोहपा नगरपरिषदेत भाजपने 20 पैकी 10 जागांवर विजय मिळवला असला तरी काँग्रेसचे माधव चर्जन मोहपा नगरपरिषदच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. त्यांनी भाजपाच्या प्रविण श्रोते यांचा अवघ्या 58 मतांनी पराभव केला आहे. अपक्ष माजी न. प. सदस्य श्रीकांत येनूरकर 1200 मते घेवून तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मोहपा नगरपरिषदेत काॅग्रेसने 20 पैकी 9 जागांवर तर एक अपक्ष उमेदवार विजय झाला आहे.

नागपूर जिल्ह्यातील कांद्री-कन्हान नगरपंचायतीत काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या गावातच काँग्रेसचा दारुण पराभव झाला. येथे भाजपचे 14 नगरसेवक निवडून आले असून काँग्रेसला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले.

तरुण नेतृत्वाची चर्चा

या निवडणुकांमध्ये तरुण नेतृत्वाने विशेष लक्ष वेधून घेतले आहे.


सिंदखेड राजा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे सौरभ विजय तायडे (वय 21 वर्षे 10 महिने) यांनी अवघ्या 169 मतांच्या फरकाने विजय मिळवत राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला.

तसेच, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे गट)च्या सिद्धी वस्त्रे (वय 22) यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत राज्यातील सर्वात तरुण महिला नगराध्यक्ष होण्याचा विक्रम केला आहे.

आकडेवारीत बदलाची शक्यता

काही ठिकाणी अद्याप मतमोजणी सुरू असल्याने अंतिम आकडेवारीत किरकोळ बदल होण्याची शक्यता निवडणूक अधिकार्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, एकूणच या निवडणुकांमध्ये महायुतीचा स्पष्ट कौल मिळाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

 

1
0

Leave a Reply

Realted News