माजी IAS अधिकाऱ्याची पोलिसांशी हुज्जत

निवृत्तीनंतर एवढा माज असेल तर सेवेत असताना यांनी काय केले असेल?

अशा अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार? : सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार

का टा वृत्तसेवा I
मुंबई : चुकीच्या ठिकाणी गाडी लावून पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या एका माजी सनदी अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधत अशा अधिकाऱ्यांवर कोण कारवाई करणार? हा सवाल उपस्थित केला आहे.

                          सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सेवानिवृत्त आयएएस अधिकारी दिलीप शिंदे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात दिलीप शिंदे हे चुकीच्या ठिकाणी गाडी लावून पोलिसांसोबत हुज्जत घालताना दिसून येत आहेत. पोलिस त्यांना ही जागा पार्किंगची नसून, गाडी इतरत्र लावा असे सांगत आहेत. पण त्यानंतरही शिंदे आपली गाडी तेथून हलवण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. कुंभार याविषयी म्हणतात, हे गृहस्थ चुकीच्या ठिकाणी गाडी लावून आपण आयएएस असल्याचे सांगत पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. यांच्या गाडीत पिवळा दिवाही दिसत आहे. कशासाठी व कोणत्या अधिकारात? हे निवृत्त आयएएस दिलीप शिंदे आहेत.
                           राजकारण्यांचे लांगूलचालन करणाऱ्या सेवकांना निवृत्तीनंतर बक्षिसी म्हणून एखादे पद दिले जाते. त्यातलेच हे एक. निवृत्तीनंतर एवढा माज असेल तर सेवेत असताना यांनी काय केले असेल? महाराष्ट्रातील सेवा हमी आयुक्तांच्या एकूणच कामगिरीचा आढावा घेतला तर त्यावर होणारा खर्च आणि होणारे काम यांचे प्रमाण फार विसंगत असल्याचे दिसते. आयएएस सेवेचे पीक अलीकडे नाही तर फार पूर्वी बिघडले आहे. पूजा खेडकर एकटी नाही. अशा अधिकाऱ्यांकडून कोणत्या सेवेची अपेक्षा करायची? आणि यांच्यावर कारवाई कोण करणार? असे कुंभार यांनी म्हटले आहे.

0
0

Leave a Reply

Realted News