नागपूर : नागपूरच्या अग्रसेन चौकात रविवारी रात्री मैत्रीच्या नात्यातील विश्वासघात आणि प्रेमाच्या त्रिकोणातून एक धक्कादायक हत्या घडली. अनुराग बोरकर (वय ३३) या तरुणाने त्याच्या मित्र शैलेश हिरालाल (उर्फ अन्ना) याच्या डोक्यावर आणि छातीत दगडाने वार करून त्याला ठार केलं. या घटनेने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.
अनुराग आणि शैलेश हे दोघेही होशंगाबादच्या कारागृहात एकत्र होते आणि तेथे त्यांची मैत्री झाली होती. पाच-सहा वर्षांपूर्वी ते नागपूरला आले आणि दोघेही येथे राहू लागले. अनुरागची लिव्ह-इन पार्टनर सोनू मरसकोल्हे हिने शैलेशसोबत राहायला सुरुवात केली, ज्यामुळे अनुरागला राग आला. रविवारी रात्री ९:४५ वाजता अग्रसेन चौकात शैलेश आणि अनुराग समोरासमोर आले. त्यावेळी अनुरागने रागाच्या भरात शैलेशच्या डोक्यावर आणि छातीत दगडाने वार करून त्याला रक्तबंबाळ केलं.
घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांनी शैलेशला रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी आरोपी अनुराग बोरकरविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला असून, तो फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेने नागपूर शहरात सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत चिंता निर्माण केली आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडून अधिक कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, प्रेम प्रकरणातून गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.