August 15, 2025 3:05 am

युवक काँग्रेसचा विधानभवनावर आक्रोश मोर्चा

पोलिसांकडून मोर्चेकरांची धरपकड,

सरकारने तरुणांचा आवाज दडपवल्याचा आरोप

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने १५ मार्च ते १९ मार्च असा पुणे ते मुंबईतील विधान भवन, युवा आक्रोश यात्रा आयोजीत केली होती. आज ही यात्रा मुंबईत धडकली व आझाद मैदानाजवळच्या मुंबई काँग्रेस कार्यालयापासून विधान भवनवर धडक मोर्चा आयोजित केला होता. पोलिसांनी आधी या मोर्चाला परवानगी दिली होती, पण नंतर या धडक मोर्चाला परवानगी नाकारली. मुंबई काँग्रेस कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने तरुण या मोर्चात सहभागी होण्यासाठी जमा झाले होते. पण पोलिसांनी ऑफीस परिसरात बॅरिकेड्स लावून बंद केले व मोर्चातील कार्यकर्त्यांची धरपकड केली.
                        पुणे ते मुंबई युवा आक्रोश मोर्चाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या यात्रेदरम्यान युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी स्वतःच्या हातात बेड्या घालून घेतल्या होत्या. ‘युवा आक्रोश’ यात्रेच्या पाचव्या दिवशी हजारो युवकांच्या उपस्थितीत विधानभवनाला घेरावच्या दिशेने कुणाल राऊतसोबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
                       महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, सामाजिक शांतता आणि सौहार्द यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सरकारला जाग आणण्यासाठी आयोजित ही आक्रोश पदयात्रा करण्यात आली होती. बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणांना न्याय मिळावा, महिलांना सुरक्षित वाटावे, शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन मिळावे, तसेच राज्यात सामाजिक एकता आणि शांततेसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, या प्रमुख मागण्यांसाठी युवक काँग्रेसने ही पदयात्रा सुरू केली होती. पोलिसांनी ही यात्रा थांबवून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक केली.

भाजप युती सरकारकडून तरुणांची फसवणूक – पटोले

                      या मोर्चात ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी सहभाग घेतला, तरुणांना संबोधित करताना पटोले म्हणाले की, केंद्र व राज्यातील भाजप सरकारने तरुणांची फसवणूक केली आहे. राज्य सरकारच्या 2.5 लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. सरकार या जागा भरत नाही. स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली तरुणांकडून शुल्क घेतले जाते व परिक्षा होत नाहीत. झाल्या तर पेपरफुटी होते. नोकर भरतीतही भ्रष्टाचार बोकाळला असून नोकर भरतीचे आश्वासन देऊन भाजप युती सरकारने तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारू असेही ते म्हणाले. यावेळी तरुणांना मार्गदर्शन करताना उदय भानू म्हणाले की, देशात बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत ज्वलंत असून ५० वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी सध्या आहे. भाजप सरकार तरुणांच्या हाताला काम देत नाही. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली. आत्ता महाराष्ट्रातील सरकारनेही निवडणुकीत तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते पण १५ लाख रुपयांच्या चुनावी जुमल्याप्रमाणे हे आश्वासनही फसवेच ठरले आहे.

तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न – कुणाल राऊत

                      महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून सरकारी रिक्त पदांची भरती केली जात नाही. स्पर्धा परिक्षांमध्ये पेपर फुटी होते, यातून तरुणांचे नुकसान होत आहे. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना सरकारने मात्र तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचा तरुण शांत बसणार नाही, यापुढेही तरुणांच्या प्रश्नांवर भाजप युती सरकारला जागे करण्याचे काम करु, असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News