August 15, 2025 6:08 am

राष्ट्रसंतांच्या भजनाने चमत्कार.. : ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक

कोण दिवस येई कसा कोण जाणतो…!

स्वावलंबी जीवनाचा आदर्श : स्व. दुर्गादास रक्षक

                         रेल्वेची धक… धक…अन्.. धुर सोडणार इंजीन… कळमेश्वरच्या शाळेतून मराठी चवथा वर्ग नुकताच पास झालेला एक बालक नागपूरकडे शिक्षणासाठी निघाला होता. त्या बालकाचे नाव होते दुर्गादास रक्षक. शाळेत तीसर्या वर्गात शिकत असतांना, दुर्गादासला चोरे मुख्याध्यापकांनी तीन रूपये पगाराची नोकरी दिली होती. चोरे सरांच्या घरातील भांडे, कपडे धुने, पाणी भरने काम करावं लागत होते.
                        चवथ्या वर्गात शिकत असतांना शाळेत अंधारे नावाचे शिक्षण अधिकारी शाळा तपासणीसाठी आले. दुर्गादासची हुशारी पाहुन चवथी नंतर याला शिक्षणासाठी माइयाकडे पाठवा. मी त्याला शिकवतो, माझ्या मुलांना खेळविण्याचं तो काम करेल. त्यांनी चोरे सरांना सर्व शिक्षकांसमोर सांगीतले. पण मुख्याध्यापक चोरे सरांचा स्वार्थ जागला घरकाम करायला दुर्गादास चांगला. त्याचा पगार तीन रूपये ऐवजी पाच रूपये करतो असे वडील विठोबाजी यांना सांगून दुर्गादासजींच शिक्षण थांबवण्याचा प्रयत्न झाला.
                       दुर्गादासच्या अस्वस्थ बालमणाने शिक्षणासाठी नागपूर गाठायचे ठरवले. बिनातीकीट रेल्वेच्या शौचालयात लपून प्रवास नागपूर पर्यंत पोहचला. तिकीट नसल्यामुळे घाबरलेला दुर्गादास रेल्वे स्टेशनच्या मागच्या गेटने बाहेर पडला. पोटात भूक, नागपूर जिल्ह्यातील सेलू जन्मगाव आणि कळमेश्वर या पलीकडचं जग न पाहलेला चिमूकला दुर्गादास मिळेल त्या मार्गाने चालत गेला. तहाण लागली म्हणून एका विहीरीवर पाणि प्यायला गेला. विहीरीवर पाणि काढणाऱ्या बाईने भाटा भीकाऱ्याच पोर, याची जात काय? म्हणून दूरून हाताच्या ओंजळीवर पाणि टाकलं. गटा गटा पाणी पीत तहान शमली. पण पोटात भूक असल्यामुळे भोवळ आली. पाणी पाजणाऱ्याच् बाईनं घरी नेऊन एका कागदावर भाकर बेसन खायला दिलं. शरीरात त्राण आला. पाय नेईल त्या मार्गाने जात, रात्रीला एका घराच्या ओसरीत थंडीनं कुडकुडत थकलेला दुर्गादास झोपी गेला.

                       सकाळी सवयी प्रमाणे दुर्गादासला लवकर जाग आली. त्यानं घराची ओसरी, आंगण झाडून काढले. सकाळी उठलेल्या घरमालकाला लहानग्या दुर्गादासचे कौतुक वाटले. त्यांनी विचारपूस केली. नागपूर शहराने माणूसकीचा परिचय दिला. या अपरिचीत देव माणसाने नागपूरच्या इतवारी टांगास्टॅंड जवळच्या एका हॉटेलात कपबशा धुण्याची नोकरी दुर्गादासला लावुन दिली.
                       हळू हळू जीवनाचा प्रवास सुरू झाला. हॉटेलमध्ये कपबशा धुण्यामुळे पाण्याने हाताला चिखल्या (खाज येने) आल्या होत्या. याच देवमाणसाच्या मदतीने एका किराणा दुकानात दुर्गादासने नोकरी पत्करली कमी वयातच त्याला पोक्तपणा आला होता. परीस्थीतीने त्याला समाजमन वाचायला शिकवीलं होतं. दुर्गादास वडील विठोबाजींना ‘दादा’ आणि आईला ‘माय’ म्हणत होता. लहानग्या दुर्गादासचं नागपूरात येणं, माय-दादाच्या आठवणीत काही दिवस अश्रू ढाळून गेलं. दादाचा दम्याचा विकार त्यामुळे हलकं फुलकं काम, त्यातून अल्प मिळणारी मजुरी – खाणारी पाच, सहा तोंड्, माय, लोकांच्या शेतात मजुरीला जायची. दोघांचे श्रम दुर्गादासजींना अस्वस्थ करीत होते. शाळेत शिकतांनाच मायच्या सोबत शेतमजुरीला जाऊन त्यांने अनेकदा कुटुंबाला आर्थिक मदत केली होती. खेड्यापाड्यात फिरून चिवडा विकला होता.
                       आपली लहान भावंड बाळकृष्ण आणि गुलाब यांना नागपूरात आणलं, किराणा दुकानात नोकरीला लावलं. सर्वांचेच शिक्षण जेमतेम अक्षर ओळख होण्या इतपत. हे भावंड एका लहानशा किरायाच्या रूममध्ये स्वयंपाक करायचे रात्री झोपायला शेजारच्या मंदिरात जायचे. झोपायला काय, तर जूटचे पोते. पोत्याच्या आतमध्ये तीघेही भावंड झोपायचे. थंडी पासनं त्यांचं संरक्षण व्हायचे.
                      दुर्गादासजीं सांगीतलेला एक प्रसंग, गरीबी कशी छळते त्याचे दुःख किती सोसावे लागते. याची जाणीव करून देते. आम्ही एका मंदिरात रात्री झोपायचो. कारण आमची रूम फारच छोटी होती. ते मंदिर एका सावकाराच्या मालकीचे होते. एक दिवस कडाक्याची थंडी होती. दुकानात काम करून थकलेलं शरीर. तेव्हा कामाची वेळ आठ घंटे नव्हती. सकाळी सहा-सातला दुकान उघडणे. दुपारी एक घंटा मधली सुटी, रात्री नऊ-दहा पर्यंत दुकान, आठवड्याची सुटी नाही. तो काळच जीवन संघर्षाचा होता. रात्री सावकार दारू पिऊन आला. आम्हाला झोपलेले पाहुन त्याचा राग अनावर झाला. त्यांने आम्हाला देवळातून हाकलले. देवालाही आमची दया नाही. तेवढ्या रात्री थंडीत आम्ही रस्त्याच्या कडेला झोपलो. बाळकृष्णा आणि गुलाब खुप झोपेत होते. मी जागून रात्र काढली.
                     दुसरा प्रसंग भुकेचा, दुर्गादासजींनी सांगीतला तो असा,  ‘एके दिवशी घरात धान्य संपले होते. नोकरीचा महीना भरायला दोन-तीन दिवस शिल्लक होते. मालकाला थोडे पैसे मागीतले त्यांनी नकार दिला होता. सकाळच्या जेवणाचे काय? प्रश्न होता- बाळकृष्ण, गुलाब आणि मी शेजारच्या दोन तीन किराणा दुकानात पाठवून तांदुळ व दाळ, मायला जास्त घ्यायचे आहे, त्याचे सॅंपल मायने मागीतले. असे खोटं सांगून सॅंपल गोळा केले.’ त्यावेळेस तशी प्रथा होती. अशा जमा झालेल्या सॅंपलच्या तांदुळ, दाळ गंजात शिजवून त्यात मीठ टाकून त्या घाट्याने भूक भागवली. त्याच रात्री मालकाने पैसे दीले. ही जीवनाची परीक्षाच होती. हा प्रसंग सांगतांना ऐकणाऱ्याच मन गहीवरून यायंच.

राष्ट्रसंतांच्या भजनाने चमत्कार

                         दुर्गादास एकदा गरीबीनें त्रस्त होते. आर्थिक विवंचणा त्यांना अस्वस्थ करीत होती. कुटुंबाच्या जवाबदाऱ्या वाढत होत्या. अस्वस्थेने मनात आत्महत्येचा विचार आला. दुर्गादास राजाबक्षाच्या हनुमान मंदिरात दर्शनाला गेले. त्याठिकाणी काही भक्त चर्चा करीत होते, तुकडोजी महाराजांचं भजन संतरंजीपुऱ्यात आहे.
‘ कोण तुकडोजी महाराज? मरायचं तर आहे. त्यांच भजन ऐकू यां. तस म्हटलं तर दुर्गादासजी वारकरी होते. पण खुप अंधश्रधाळू नव्हते. तुकडोजी महाराजांची भजने दुर्गादासजींनी ऐकली. त्यातील एक भजन होते.
                         ‘कोण दिवस येई कसा, कोण जाणतो ? I एक दिवस हत्तीवरी, मिरविती त्या नवर्यापरी II
एक दिवस मिठ-भाकरी, दारी मागतो ॥’   हे भजनातील शब्द मनाला भिडले. एक आणा (सहा पैसे) चे भजनाचे पुस्तक घ्यायला त्यांचेकडे पैसे नव्हते. प्रचंड गर्दीत मार्ग काढंत दुर्गादास तुकडोजी महाराजा पर्यंत पोहचले. ‘ आपलं भजन आवडलं, पण पुस्तक घ्यायला पैसे नाहीत. ‘तुकडोजी महाराजांनी दुर्गादासकडे पाहले एक भजनाचे पुस्तक हातात ठेवले. बस त्या भजानाच्या शब्दांनी आत्महत्या करणारे पाय सन्मार्गाकडे वळलेत.’
                           किराणा दुकानात काम करीत असतांना दुर्गादासचे मालक एकदा म्हणाले, ‘तू किती दिवस नोकरी करशील ? व्यवसाय कर’. ‘ मी गरीब व्यवसाय करायला पैसे कुठून आणू ? ‘. मालक म्हणाले, ‘अरे आठवडी बाजारात मसाल्याचे लहान लहान ढीग करून दुकान असते. मसाल्याचे दुकान सुरू करायला किती भांडवल लागत असेल ? ‘विस-पंचवीस रूपये’. ‘तूझे माझ्याकडे किती पैसे जमा आहे.’ ‘सत्तर-ऐंशी रूपये असेल.  ‘तू किती दुकानाचा मालक बनु शकतो ? ‘ त्या एका प्रश्नानेच दुर्गादासला मालक बनविले.
                           दुर्गादासजींच्या मालकाने दिलेले उत्तर आजच्या तरूण पीढ़ीलाही प्रेरणादायी आहे. दुर्गादासने १०० रूपयाच्या भांडवलावर पहीले किराणा दुकान सुरू केले. सर्व सहाही भावांची एकजुट, परीश्रम आज सुपरबाजाराच्या आधुनिकतेत परीवर्तित होऊन नागपूर शहरात विश्वसनीय किराणा, धान्य व्यवसायात रक्षक परिवार नावारूपास आला.
                          दुर्गादासजी रक्षक हे रक्षक परिवाराचे आधारवड आणि माझे वडील आहेत. मला जेव्हा पासून समजायला लागलं, तेव्हा पासून मी त्यांच संघर्षमय जीवन जवळून पाहीले आहे.. सहा भावांचा संसार त्यांची एकजूट ठेवतांना त्यांचे संघटन कौशल्य अभ्यासन्यासारखं होते. टीमकीत जळाऊ लाकडाची टाल (वखार), मोमीनपुर्यात एकमेव हिंदुचा पानठेला यातून आर्थिकता सबळ होत गेली. मात्र दुर्गादासजी तीथे थांबले नाही. नेहमी आधुनिकतेची कास त्यांनी स्वीकारली. आज रक्षक परिवार त्यांचा वैचारीक वारसा जपत आहे.
                          दुर्गादासजींचा जीवनपट खुप मोठा आहे. त्यांच्या जीवनातील ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे वैचारीक योगदान’ खरंच् मानवी जीवनाला प्रेरणादायी आहे. दुर्गादासजींच् जीवन स्वावलंबी राहलं आहे.. असा हा स्वावलंबी जीवनाचा आदर्श ४ ऑगस्ट २०१८ ला मृत्युशी मैत्री करता झाला. त्यांच्या स्मृतिंना विनम्र अभिवादन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News