August 15, 2025 9:19 am

विदर्भाच्या पंढरीत ‘भक्ती’चा महापूर : शेकडो भाविकांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन 

विदर्भाच्या पंढरीत ‘भक्ती’चा महापूर

जय हरी विठ्ठल’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर 

का टा वृत्तसेवा I विजय नागपुरे 
कळमेश्वर : विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र धापेवाडा येथे शुक्रवारी वारकऱ्यांसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. ‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. पहाटे विठ्ठल-रुक्मिणीचा अभिषेक व महापूजा आटोपल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. कळमेश्वर तालुक्यात मागील तीन दिवस सर्वत्र जोरदार पाऊस झाला असला तरी शुक्रवारी पावसाने दिवसभर उसंत दिल्याने यात्रेत मात्र भक्तीचा महापूर आला होता.
महापुजेवेळी विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक झालेले आमदार डॉ. आशिष देशमुख, आयुषी देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी, मठाधिपती श्रीहरी बापू वेळेकर, मायबाई वेळेकर आदी मान्यवर.
महापुजेवेळी विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक झालेले आमदार डॉ. आशिष देशमुख, आयुषी देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी, मठाधिपती श्रीहरी बापू वेळेकर, मायबाई वेळेकर आदी मान्यवर.
                              विदर्भाचे पंढरपूर श्रीक्षेत्र धापेवाडा येथे आषाढी यात्रेनिमित्त सोमवारी पहाटे आमदार डॉ. आशिष देशमुख, आयुषी देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी, मठाधिपती श्रीहरी बापू वेळेकर, मायबाई वेळेकर यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. याप्रसंगी सरपंच मंगला शेटे, देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष भानुप्रताप सिंह पवार, सचिव आदित्यप्रताप सिंह पवार उपस्थित होते.

 

                         मंदिर परिसरात जवळपास ४०० भजनी मंडळे व दिंड्या पालख्या बाहेर गावावरून आल्या होत्या. ‘ज्ञानोबा माउली, ज्ञानराज माउली तुकाराम’च्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या साथीने भजन, कीर्तन म्हणत हजारो विठ्ठल भक्तांनी माउलीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वयंसेवी संस्थांतर्फे करण्यात आली होती, तर येथे आलेल्या प्रत्येक भाविकांना महाप्रसाद व अल्पोपाहाराची व्यवस्था करून देण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत दीड लाखाच्या जवळपास भाविकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर विश्वस्तांनी सांगितले.

                        यात्रा सुव्यवस्थेत पार पडावी याकरिता उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विकास बिक्कड, नायब तहसीलदार संदीप तडसे, मंडळ अधिकारी शरद बोरकर, ग्रामविकास अधिकारी ईश्वर धुर्वे लक्ष ठेवून होते. यात्रेच्या नियोजनासाठी मंदिर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रुद्रप्रताप सिंह पवार, निखिल गडकरी, विलास वैद्य, अरुण चिखले, प्रभाकर रानडे आदींनी प्रयत्न केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News