चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४४.६ अंश तापमान;
नागपूर ४४ अंशांवर
नागपूर : विदर्भात उन्हाची तीव्रता वाढली आहे. रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ४४.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नागपुरात पारा ४४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला.
सकाळी ९ वाजल्यापासूनच कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. दुपारी १२ ते ४ या कालावधीत नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. विदर्भातील इतर शहरांमध्येही उष्णतेची लाट जाणवत आहे. ब्रम्हपुरी आणि अमरावतीत ४४.४ अंश, वर्धा येथे ४४.०, अकोला येथे ४४.३, यवतमाळ येथे ४३.६, गडचिरोली येथे ४२.६, गोंदिया येथे ४२.२ आणि वाशिम येथे ४२.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. बुलढाणा मात्र तुलनेने थंड राहिले असून तेथे ३९.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले.
शनिवारी नागपूरमध्ये ४४.७ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. त्याच दिवशी अकोला येथे ४४.३ अंश, तर वर्धा आणि चंद्रपूर येथे ४४ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.









